काशिनाथ वाघमारे, सोलापूर: शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा सोलापूरकरांना जबर बसला. अनेक भागांमध्ये लहान-मोठे वृक्ष कोसळले, विद्युत तारा तुटल्या, पाेल वाकले. घरांवरील पत्रे उडाले. या नैसर्गिक संकटाला तोंड देत रहिवाशांनी घरात शिरलेल्या पाण्याचा रात्रभर उपसा केला, दारात उन्मळून पडलेली झाडं बाजुला केली, रात्रीत कर्मचा-यांनी धावाधाव करुन सकाळपर्यंत बहुतांश भागात वीज पुरवठा पूर्ववत केला.
शुक्रवारी सकाळी ढगाल वातावरण होते. दुपारी सूर्यनारायणाचे दर्शन झाले आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून वादळी वा-याला सुरवात झाली. वादळी वा-यात प्रचंड धुळ उडाली. याबरोबरच अवकाळी पावसानेही जोरात हजेरी लावली आणि त्या सोबतच विजांचा कडकडाट झाला. शहरात अभिमानश्री नगरात कडाडती वीज कोसळल्या नंतर या भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आणि नागरिक भयभीत झाले.फाॅरेस्ट परिसरात तुराट गल्लीसह अनेक घरांमध्ये पाणी शिरले.
जुळे सोलापुरला तडाखा
जुळे साेलापुरात नवीन आरटीओ रस्ता ते अशोक नगर परिसरात झाडं उन्मळून पडले आणि पोलही वाकडे झाले. बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. याबरोबरच दावत चौकात बँकेच्या बाजुला कँटीनसमोर आणि आसरा चौकात सीग्नलच्या बाजुला असलेले झाड कोसळले. डीमार्ट समोर माेठ्या प्रमाणात चिखल झाला आणि पालापाचोळा साचला.
होटगी रोडवर विद्युत पुरवठा खंडीत
शुक्रवारी सायंकाळी वादळी वा-यात होटगी रोडवर काडादी नगर, आसरा सोसायटी, कल्याण नगर भागात वीज पुरवठा खंडीत झाला. किनारा हॉटेल परिसरात गंगाधर हौसिंग सोसायटीत तुटलेले कंडक्टर जोडून वीज पुरवठा करण्यत आला. बाजुलाच औद्योगिक वसाहतीत अंत्रोळीकर नगरमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. मंत्री चंडक विहारमध्ये अर्थात आसरा चौकाती पेट्रोलपंपामागे सर्व्हीस वायरवर झाड तुटून पडले. औद्योगिक वसाहतीत पाणी टाकीजवळ मुख्य लाईन पूर्ववत करण्यात आली. आनंद नगरमध्ये सकाळी तारा जोडून वीज पुरवठा करण्यात आला.