मंगळवेढा : स्थानिक पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास करून मंगळवेढयातील दरोडा व सांगोल्यातील खुनाचा तपास काही महिन्यांनंतर लागलेला नाही. गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने गुन्हेगार हे मोकाट आहेत. त्यामुळे या दरोडा व खूनाचा तपास करून आरोपीला जेरबंद करण्याची जबाबदारी आता एका स्वतंत्र टीमकडे देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिली.
मंगळवेढा येथे डीवायएसपी कार्यालयाच्या वार्षिक तपासणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलीस अधीक्षक म्हणून तेजस्विनी सातपुते रुजू झाल्यानंतर त्यांनी प्रशासनात अनेक बदल केले. या बदलामुळे पोलिसांचे कामकाज अधिक गतिमान झाले आहे. सातपुते यांनी प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याबरोबर शिक्षेचे प्रमाण वाढावे यावर भर दिला आहे. मंगळवेढा व सांगोला या पोलिस स्टेशनच्या गुन्हे पेन्डन्सीचे प्रमाण ४० ते ४५ टक्के असून ते २५ ते ३० टक्के पर्यत खाली आले पाहिजे असे त्यांनी सूचित केले.
मंगळवेढा शहरालगत असलेल्या संजय हजारे यांच्या बंगल्यावर मागील दीड महिन्यापुर्वी दरोडा पडला होता.या दरोडयाचा तपास व सांगोला येथील प्रलंबीत खून प्रकरण या दोन्ही घटनेचा तपास लावणेकामी स्वतंत्र टिम तयार करून त्याचा छडा लावण्याच्या सूचना यावेळी दोन्ही पोलिस निरिक्षकांना करण्यात आल्या.मंगळवेढा येथील नवीन डीवायएसपी कार्यालयाचे बांधकाम अंतीम टप्प्यात असून किरकोळ कामे निधीअभावी रखडली आहेत. निधीसाठी पोलिस अधिक्षक सातपुते यांनी थेट जिल्हाधिकाऱ्याशी मोबाईल वरून चर्चा केली. या दरम्यान त्यांनी निधी देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. बांधकाम पूर्ण होताच डी.वाय.एस.पी.कार्यालय स्थलांतरीत केले जाईल असे सातपुते यांनी सांगितले. नेहमी दामाजी चौकात मोठया प्रमाणात गर्दी असते.परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सातपुते यांनी अवजड वाहतूक बंद करण्याच्या सूचना केल्या.
सध्या शाळा, कॉलेज सुरु झाल्यामुळे छेडछाडीच्या घटनांना लगाम लावण्यासाठी दामिनी पथकाने आलेल्या तक्रारीवर समुपदेशन व कारवाईही करावी . ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत व ग्रामसुरक्षा पथकाव्दारे चोरी,अपहरण यासारख्या घटनेतील गुन्हेगार पकडण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेला यश येत आहे. अपहरण घटनेतील मुले-मुलीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.असेही त्यांनी सांगितले.