दीपक दुपारगुडे, सोलापूर: जोपर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खर्डी गावातील साखळी उपोषण सुरू राहील, असे सकल मराठा समाजाच्या तरुणांनी म्हटलेले आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याची शपथही मराठा आंदोलकानी घेतली आहे.
शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरपर्यंत वेळ मागून घेतलेला आहे. तरीही खर्डी गावातील सकल मराठा समाजाच्यावतीने जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सकाळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार तरुणांनी केलेला आहे. बुधवारी पावसातही उपोषण सुरूच असलेले पाहायला मिळाले. या उपोषणासाठी विविध समाज घटकांचा पाठिंबा मिळत आहे. जय जिजाऊ..जय शिवराय.. एक मराठा.. लाख मराठा... घोषणेने परिसर दणदणून निघाला. एकच मिशन... मराठा आरक्षण... अशा आशयाचे फलक गावामध्ये झळकू लागले आहेत.