यामुळे रब्बी हंगामातील काढणी सुरू असलेल्या ज्वारी, हरभरा पिकांसह द्राक्षे बागांना या पावसाचा फटका बसणार आहे.
हवामान विभागाने रविवारी पावसाचा इशारा दिला होता. परवापासूनच ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकरीवर्ग रब्बीची कामे उरकण्याची लगबग होती. अजूनही काही भागात उशिरा पेरणी झालेल्या ज्वारीची काढणी, मळणीची कामे सुरू आहेत. तसेच कडब्याच्या गंजी लावण्याची कामे सुरू आहेत. कित्येक शेतकऱ्यांचा कडबा शेतात गोळा करून तसाच पडलेला आहे.
अशातच रविवारी दुपारी बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातील वालवड परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे रब्बी कांदा पिकाचे नुकसान झाले. काही ठिकाणी शेतात काढून पडलेली ज्वारी भिजली. काही ठिकाणी खळे भिजले. वादळी वाऱ्यामुळे गंजीचा कडबा उडून जाऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सोमवारीदेखील सायंकाळी ५ च्या दरम्यान बार्शी शहर आणि ग्रामीण भागातदेखील जोराच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
----