यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी औषधासाठी खर्च करून पिके आणली. ज्वारी, गहू, हरभरा व इतर पिकांची पेरणीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांनी चांगला जोर धरला असताना बुधवारी जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडल्या. यामुळे ज्वारीचे कणीस तसेच कडबा काळा पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कांदा पिकाचेही नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान द्राक्ष व आंब्याचे होणार आहे. आंब्याचा मोहर व कैऱ्या गळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी जवळपास आंब्याच्या सर्वच झाडांना मोहर लागला आहे. मात्र, दोन दिवसांचा वारा व पाऊस आंब्यासाठी हानिकारक ठरत आहे. द्राक्षांचीही हानी होईल, असे शेतकरी सांगत आहेत.
----
रंगीत द्राक्षावर पावसाचा परिणाम होईल. नियमित द्राक्षाला फार असा फटका बसणार नाही. मात्र, अशीच परिस्थिती एक-दोन दिवस राहिल्यास नुकसान मोठे होणार आहे. गहू, ज्वारी व आंब्याचे काही भागात नुकसान होईल.
- शिवाजी पवार
उपाध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ
----