एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच कडक उन्हाळा सुरू झाला. यामुळे तीन दिवसांपासून अक्कलकोट तालुक्याच्या जवळील भागात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. १३ एप्रिल रोजी गुडीपाडवाचे मुहूर्त साधून तालुक्यात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला.
हा पाऊस तालुक्याच्या पूर्व भागातील खैराट, गोगाव, वागदरी, शिरवळ, घोळसगाव, चप्पळगाव, हन्नूर, दुधनी, मैंदर्गी, तोळणूर, अक्कलकोट शहर, सलगर, चिक्केहळळी, सांगवी, जेऊर अशा अनेक भागांत पाऊस झाला. यामुळे सर्वत्र रस्त्यावरून पाणीच पाणी वाहिले. या पावसामुळे सध्या शेतकऱ्यांच्या हाताला आलेले ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात आतापर्यंत ६० टक्के शेतकऱ्यांच्या राशी झाल्या आहेत. उर्वरित पिके शेतात पडून आहेत. या पावसाने ऊस, केळी, डाळिंब, भाजीपाला या पिकांना कडक उन्हात दिलासा मिळाला आहे.