सोलापूर : पहाटेचे ४ वाजलेले.. सात रस्ता चौकातून जिल्हा बालसंरक्षण पथकाची गाडी मंद्रुपच्या दिशेने रवाना... साडेचार वाजण्याच्या सुमारास मंद्रुप पोलीस ठाण्यासमोर दाखल... पावणेपाच वाजता मंद्रुप पोलीस ठाण्यातील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचे पथक ठाण्याबाहेर.. पोलीस अन् बालसंरक्षण पथकाच्या दोन गाड्या होनमुर्गीकडे रवाना... सव्वापाच वाजण्याच्या सुमारास होनमुर्गीत दाखल.. झोपलेल्या ग्रामस्थांना उठवून घरचा पत्ता शोधला अन् साडेपाचच्या सुमारास विवाहस्थळी दाखल... वय कमी असतानाही दोन सख्ख्या चुलत बहिणींचा होणारा विवाह पोलिसांच्या मदतीने जिल्हा बालसंरक्षण कक्षाने रोखला.
ही घटना आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी गावातील. चडचण (कर्नाटक) येथील एका १७ वर्षीय बालिकेचा बालविवाह गुप्त पद्धतीने पहाटे ५ वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी येथील युवकाशी होणार असल्याची माहिती चाइल्ड लाइन १०९८ द्वारे जिल्हा बालसंरक्षण कक्षास मिळाली होती. या माहितीच्या आधारे बालसंरक्षण कक्षाच्या पथकातील प्रमुखांनी मंद्रुप पोलिसांना माहिती दिली. माहितीच्या आधारे पोलीस अन् बालसंरक्षण कक्षाने दोन पथके तयार केली. दोन्ही पथकांनी होनमुर्गी येथे धाड टाकून होणारा बालविवाह रोखला.
रोखायला गेले एकीचा अन् निघाल्या दोघी
बालसंरक्षण कक्षाच्या पथकातील अधिकारी वय कमी असलेल्या एका मुलीची माहिती घेत होते. कागदपत्रांची तपासणी करीत होते, अशातच दुसरी एक मुलगी नवरीच्या वेशात अचानकपणे पथकातील एका सदस्याला दिसून आली. त्यानंतर त्यांनी त्या मुलीचीही चौकशी केली असता तिचाही विवाह होणार होता अशी माहिती मिळाली. बालसंरक्षण पथकाने १६ व १७ वय असलेल्या दोन मुलींचा बालविवाह रोखण्यात पथकाला यश मिळाले.
यांनी केली कारवाई....
ही कारवाई मंद्रुप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन थेटे, पोलीस नाईक प्रदीप बनसोडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल आर.एस. शेख, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, आर.यू. लोंढे यांनी केली. बालसंरक्षण कक्षाने जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, परिवीक्षाधीन अधिकारी दीपक धायगुडे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.
बालसुधारगृहात रवानगी
वय नसलेल्या दोन मुलींचा बालविवाह रोखला. त्यानंतर त्या मुलींचा व पालकांचा जबाब पोलिसांनी घेतला. त्यानंतर त्या दोन मुलींची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर बालकल्याण समितीसमोर त्या दोन मुलींना हजर केले असता समितीच्या प्रमुखांनी त्या दोघींना बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले, त्यानुसार त्या दोघींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.