बार्शी : उडीद आणि सोयाबीनला बक्कळ पैसा मिळतो म्हणून बार्शी तालुक्यातील शेतकरी या पिकाकडे वळला आहे. यामुळे तूर, कापसासह अन्य खरीप पिके मागे पडली आहेत. तालुक्यात खरिपाची १२५ टक्के पेरणी झाली आहे.
तालुक्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दीड महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाला. मृग नक्षत्रात खरीप पेरण्यांना वेळेवर सुरुवात झाली. खरीप हंगामातील पेरण्या संपल्या. त्यानंतरही पाऊस पडत राहिला. १९ जुलैपर्यंत तालुक्यात सरासरीच्या ५७,३८९ हेक्टरपैकी ७१,३६१ हेक्टर (१२४.४५ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. तालुक्यात यंदाही सोयाबीनची सर्वाधिक ४९,२७३ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी दिली.
तालुक्यातील दहा मंडळात पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. जून महिन्याची तालुक्याची पावसाची सरासरी ही १०७ मि.मी. एवढी आहे. जून महिन्यात तालुक्यात १५८.४ सरासरीच्या १४७.६ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, या पावसामध्ये खंड असल्यामुळे काही भागांत पेरणीची ओल कमी-अधिक प्रमाणात होती. त्यामुळे साधारणपणे पेरण्या या एक महिना चालल्या.
-------
पेरणी झालेले क्षेत्र...
सोयाबीन-४९,२७३, तूर-९१७८, उडीद-११,३५५, मूग-१३५५, भुईमूग-१५१, मका-४९ , कांदा-९५४ तर मिरची ७१, टोमॅटो-८३ हेक्टर याप्रमाणे खरीप हंगामात खरीप पिके व भाजीपाला यांची लागवड झाली आहे.
-----
सोयाबीनची यंदाही सर्वाधिक पेरणी
यावर्षी तालुक्यात तुरीचे क्षेत्र घटले आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील सोयाबीन आणि त्याखालोखाल उडिदाची पेरणी सर्वाधिक झाली आहे. सोयाबीन व उडिदाला दरही चांगला आहे. तसेच कमी कालावधीमध्ये हे पीक येत असल्याने या पिकाची लागवड वाढली आहे.