सध्या पेरणीसाठी लागणाऱ्या युरियाचा साठा मंगळवेढा तालुक्यात उपलब्ध नसल्याने युरियाबाबत शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा आहे. तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग यांनी संयुक्तपणे खरीप पेरणीपूर्वी खताचे नियोजन करणे अपेक्षित असताना तसे न झाल्यामुळेच सध्या खताची टंचाई जाणवत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. युरिया खताव्यतिरिक्त इतर मिश्रखते उपलब्ध आहेत. मात्र, ही खते परवडणारी नसल्यामुळे शेतकरी पेरणीसाठी धजावत नाहीत.
खते उपलब्ध करून देण्याच्या सूचना
कृषी खात्याकडे युरिया खताच्या टंचाईबाबत माहिती घेतली असता युरिया खताची टंचाई असल्याचे कृषी विभागानेही मान्य करून बफर स्टॉकमधील युरिया उपलब्ध करून देण्याच्या सूचना खत दुकानदाराला दिल्याचे सांगण्यात आले. एक आठवड्याच्या कालावधीनंतर युरिया रॅक लागण्याची शक्यता असल्याने युरिया उपलब्ध होणार असल्याचेही कृृषी अधिकारी श्रीखंडे यांनी सांगितले.
पेरणी झालेले पिकनिहाय क्षेत्र
बाजरी ६४८३ हेक्टर, मका २६७८ हेक्टर, तूर ४१७७ हेक्टर, मूग ६६६ हेक्टर, उडीद ४२७ हेक्टर, एकूण कडधान्ये ५२७१ हेक्टर, भूईमूग ८३२ हेक्टर, सूर्यफूल १९०४ हेक्टर, सोयाबीन १७ हेक्टर, गळीतधान्य २७५४ हेक्टर असे १७ हजार १८८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. अद्याप १९५४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणे बाकी आहे.