रोपळे (ता. माढा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे. गावच्या सरपंच वैशाली गोडगे यांचे पती व गावचे माजी सरपंच तात्यासाहेब गोडगे (रा. रोपळे) कुर्डूवाडीतील ओळखीच्या व्यक्तीला घेऊन आरोग्य केंद्रात आले. यावेळी लसीचे टोकन नंबर न घेता, रांगेतून लस न घेता थेट लसीकरण सुरू आहे तिथे आत गेले. माझ्या माणसांना लस द्या अन्यथा तुमची बदली करून टाकेन, गावात राहू देणार नाही, बेइज्जत करून गावातून हाकलून देईन, अशी भाषा वैद्यकीय अधिकाऱ्यांना वापरली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला. २६ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा २७ मे रोजीही दूरध्वनी करून माझ्या माणसांना लस द्या नाही तर तुम्हाला जीवे मारीन अशी धमकी दिल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राखी वसंतराव भंडारे (वय ४८, रा सरकारी क्वाॅर्टर, रोपळे) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार माजी सरपंच तात्यासाहेब गोडगे (रा. रोपळे)यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिराने गुन्हा नोंदला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत.
----
मी रोपळे गावचा विद्यमान सरपंच प्रतिनिधी असून माझ्या गावच्या हितासाठी लसीकरणाबाबत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला मी विचारणा केली होती. परंतु त्यांनी मला टोलवाटोलवीची करत उत्तरे दिली. यामुळे मी जिल्ह्याच्या व तालुक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लसींची गावासाठी मागणी केली. याचा मनात राग धरून माझ्यावर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला आहे. माझ्याकडे त्यांना बोललेले सर्व रेकॉर्डिंग आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची धमकी व गैर बोललो नाही.
तात्यासाहेब गोडगे
माजी सरपंच तथा सरपंच प्रतिनिधी, रोपळे.
------