संत दामाजी साखर कारखान्यासंदर्भात २५ व २६ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या साखरविक्रीबाबत आलेल्या बातमीमुळे सभासद, ऊस उत्पादकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने कारखान्याच्या कामकाजात वेळोवेळी अडचणी निर्माण झालेल्या असतानाही गळीत हंगाम २०१८-१९ व २०१९-२० मधील ऊसतोडणी, वाहतूक ठेकेदारांची तोडणी वाहतूक बिले, कामगारांचे पगार, प्रॉव्हिडंट फंड, जीएसटी रक्कम, मशिनरी दुरुस्ती व निगा, शासकीय देणी अदा केली आहेत. सध्या कारखान्यावर २०० कोटींचे कर्ज असल्याचे वृत्त निराधार व खोटे आहे. प्रादेशिक सहसंचालक सोलापूर यांच्याकडे अशोक कृष्णा जाधव व इतर २१ जणांनी जो तक्रारअर्ज दिला आहे, तो चुकीच्या पद्धतीने दिला आहे. सदर २२ तक्रारदार व्यक्तींपैकी एकही व्यक्ती कारखान्याची सभासद नाही, हे सभासदांना माहीत असावे म्हणून खुलासा करीत असल्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी सांगितले.
मशिनरी दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर
कारखान्याचे अध्यक्ष आ. समाधान आवताडे व संचालक मंडळाने आजपर्यंत कारखान्याचा कारभार अत्यंत काटकसरीने चालविला आहे. गळीत हंगाम २०२१-२२ साठी मशिनरी दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून ऊसतोडणी, बैलगाडी ठेकेदारांचे करार पूर्ण झालेले आहेत. यावर्षी ऊस पिकाची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. यामुळे संचालक मंडळाने गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ६ लाख मे. टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी श्री संत दामाजी कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी केले आहे.