सोलापूर : बांधकाम पूर्ण होऊनही बंद अवस्थेत राहिलेल्या बरूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील बीएसएफ कॅम्पच्या इमारतीमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. ही इमारत तीन वर्षांपासून वापराविना पडून आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप परिसरात राहणाºया नागरिकांना कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावापासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रशासन विविध मार्गांचा अवलंब करीत आहे. मंद्रुप पोलीस कार्यक्षेत्रातील गावामध्ये नियमितपणे गस्त घालत आहेत. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अपर तहसील कार्यालयात परिस्थितीची दैनंदिन माहिती घेतली जात आहे.
अतिरिक्त तहसीलदार उज्ज्वला सोरटे या महसूल यंत्रणेच्या मदतीने गावोगावी जनजागृती करण्याच्या उपक्रमांना प्रोत्साहन देत आहेत. आगामी काळात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी मंद्रुपच्या ग्रामीण आरोग्य रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयात विलगीकरणासाठी स्वतंत्र १० बेड तयार ठेवण्यात आले आहेत. वैद्यकीय उपचाराची साधने व उपलब्ध साधनांचा आढावा घेण्यात आला. अन्य आवश्यक सुविधा ग्रामीण रुग्णालयात तातडीने पुरवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
सोलापूर विभागाच्या उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील-नाईकडे यांच्या उपस्थितीत मंद्रुप परिसरातील नागरिकांना कोरोना व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या ग्रामस्तरीय समित्यांची बैठक घेऊन स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या़ गावचे तलाठी याकामी समन्वयाची भूमिका बजावतील, असे त्यांनी स्पष्ट केले.कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांचे विलगीकरण करण्यासाठी बरुर येथील सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची पाहणी सोलापूर उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील-नाईकडे, अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी केली. ही इमारत सुसज्ज असून, तिची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले .
३०० बेडसची होईल सोय- बीएसएफ प्रशिक्षण केंद्राच्या सुसज्ज इमारतीत वीज, पाणी आणि रस्ते अशा सर्व सुविधा आहेत़ याठिकाणी असलेल्या निवासी गाळ्यात ( फ्लॅट्स) तब्बल ३०० रुग्णांची विलगीकरणाची सोय होणार आहे . आरोग्य, महसूल आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितपणे इमारतीची विलगीकरणासाठी निवड केलेली आहे.
टोलेजंग इमारती रिकाम्याच- केंद्रीय सुरक्षा बलाने सीमा सुरक्षा बलाच्या जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी ६ वर्षांपूर्वी भूसंपादन करून इमारत बांधणीचे काम हाती घेतले होते़ तीन वर्षांत इमारत बांधून पूर्ण झाली़ जागेभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली़ या ठिकाणी सात बहुमजली टोलेजंग इमारती आहेत़ त्यात जवळपास ४८ निवासी गाळे (फ्लॅट्स) आहेत़ सध्या या इमारती रिकाम्याच आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी खबरदारी घेत आहोत़ नागरिकांचाही प्रतिसाद चांगला आहे़ संशयित रुग्णांच्या विलगीकरणाची आवश्यकता भासल्यास बरूर येथील बीएसएफ सेंटर निश्चित करण्यात आले आहे़-संदीप धांडे, सपोनि, मंद्रुप पोलीस ठाणे