सोलापूर : उसाची शेती करताना शेणखत, गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते़ शेतकºयांनी नैसर्गिक शेतीचा आग्रह धरावा, असे आवाहन मृदा शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांनी कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात बोलताना केले.
कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकºयांसाठी परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात मृदा शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे आणि कीटकनाशक तज्ज्ञ डॉ़ पांडुरंग मोहिते यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी होते. कारखान्याच्या कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात हा परिसंवाद पार पडला.
ऊस पिकासाठी माती परीक्षण महत्त्वाचे असून, शेतकºयांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत आबासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, कोणतेही पीक घेण्यासाठी माती परीक्षणाची गरज आहे. मातीमध्ये कोणते घटक आहेत, याची तपासणी झाल्याखेरीज तिला नवीन अन्नघटक काय द्यावे लागतील, हे कळणार नाही. पारंपरिक शेतीचे दिवस आता संपले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर केला नाही तर शेती तोट्यात जाते असे सांगताना उसाच्या शेतीसाठी माती परीक्षण, सरी पद्धत, मातीतील जीवाणूंचे रक्षण आदींमुळे उत्पादन वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या परिसंवादाला कारखान्याचे संचालक रमेश बावी, गुरुसिद्ध म्हेत्रे, सुरेश झळकी, मल्लप्पा चांभार, काशिनाथ कोळी, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, बळीराजा मासिकाचे युवराज भोसले यांची उपस्थिती होती़ शेतकºयांचा प्रतिसाद उत्तम होता. कारखान्याचे ऊसविकास अधिकारी विजयकुमार सरूर यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक सिद्धाराम चाकोते यांनी आभार मानले.
प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घ्या- उसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी शेतकºयांनी आधीपासून घेतली पाहिजे़ त्यासाठी वेळोवेळी फवारण्यांची गरज असल्याचे मत कीटकनाशक तज्ज्ञ डॉ़ पांडुरंग मोहिते यांनी मांडले़ अध्यक्षपदावरून बोलताना धर्मराज काडादी यांनी साखर कारखानदारी संकटातून मार्गक्रमण करीत असल्याचे सांगितले़ आठ दिवसांत शासनाने नवीन धोरणाचा स्वीकार केल्यामुळे साखर उद्योगाला मदत होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.