सोलापूर : स्वयंपाक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस टाकीमधील गॅस अवैधपणे रिक्षात भरताना सिलिंडर व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी चौघांविरोधात वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय आनंद डोंगरे (वय २४, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नितीन अंबादास यादगिरी (वय ३५), जाफर ईस्माईल कारगिर (वय ३५), आदिल रफिक शेख (वय ३५), विजय गणपा (वय ३४) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुंभारी येथे अवैध गॅस रिक्षात भरत असताना धाड टाकली. या धाडीत रिक्षा, इलेक्ट्रिक मोटार, पाइप, नोझल, वजनकाटा, ७ घरगुती वापरणाऱ्या सिलिंडरच्या टाक्या, १ रिकामी टाकी, असा एकूण १ लाख ७६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणाची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख करीत आहेत. मागील काही दिवसांपासून कुंभारी परिसरात अवैध गॅस खुलेआम विक्री होत असल्याच्या घटना घडत होत्या.