सोलापूर : लॉकडाऊननंतर आगारातच बंदिस्त असलेल्या एस. टी. गाड्या चांगल्याच धावू लागल्या आहेत; मात्र तांत्रिक अडचणीमुळे तिकीट मशीन (ईटीआय) बंद पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यात १५ हजार तिकीट यंत्रे बंद असून, काही मार्गांवर वाहक जुन्या तिकिटांचा वापर करुन प्रवाशांना सेवा देत असल्याची माहिती राहुल तोरो, राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) चे राहूल तोरो यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
लॉकडाऊन काळात राज्यभरातील एसटी सेवा पूर्ण बंद होती. परिणामी या कालावधीमध्ये मशीनचा वापरही बंद होता़ सध्या ईटीआय मशीन वापरास सुरू केल्यानंतर मशीन बंद पडण्याच्या तक्रारी वाढत आहेत़ एस. टी. प्रशासनाला खासगी कंपनीकडून या मशीनचा पुरवठा केला जातो़ राज्यभरात एसटीकडे ३८ हजार ५३३ ईटीआय मशीन असून त्यातील १५ हजार ३७ मशीन नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी महामंडळाकडे आलेल्या आहेत़ नादुरुस्त मशीन पैकी पाच हजारांपेक्षा जास्त मशीन हे दुरुस्त करून महामंडळाला देण्यात आल्या आहेत.
सध्या अनेक विभागात पूर्ण क्षमतेने फेºया सुरू झालेल्या नाहीत. यामुळे ईटीआय मशीनची कमतरता भासत नाही़ पण अचानक मशीन बंद पडल्याने वाहकांना मात्र मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ तिकीट लवकर न येणे, मशीन हँग होणे, चार्जिंग लवकर उतरणे, कोणतेही बटन दाबल्यास ठराविक बटन दाबले जाणे, कार्ड रिड होण्यास विलंब लागणे अशा अनेक समस्या वाहकांना येत आहेत़गेल्या अनेक दिवसांपासून मशीन वापरात नसल्याने अडचणी येत होत्या़ पण कोणत्याही विभागात मशीनमुळे काम बंद पडले नाही़ गेल्या दोन दिवसांमध्ये तीन-चार हजार मशीन हे बदलण्यात आले आहेत़ सध्या जवळपास १० ते १५ टक्के मशीन दुरूस्त करण्याचे काम करण्यात येत आहे.
- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, वाहतूक