सोलापूर : शेतकºयांनी उत्पादन वाढीसाठी माती परिक्षणाचा आग्रह धरावा. रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीवर भर द्यावा. उत्पादन खर्चात कपात करावी आणि उत्पादित मालावर प्रक्रिया करून स्वत:च त्याचे मार्केटिंग करावे, असा सल्ला राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकºयांना दिला.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील होम मैदानावर सोलापूर जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी सकाळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी देशमुख बोलत होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख अध्यक्षस्थानी होते.
सहकारमंत्री म्हणाले, शेतकरी आज रासायनिक खते वापरून विषारी शेती करून त्यामध्ये विषारीच पिके आणि फळभाज्या तयार करत आहेत. रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत बिघडत चालला आहे. रासायनिक शेती तात्पुरती फायदेशीर असली तरी सेंद्रिय शेतीचे अनेक फायदे आहेत. सेंद्र्रिय शेतीची आज काळाची गरज बनली आहे. हरितक्रांती करण्यासाठी शेतकरी आज आपल्या शेतीत रासायनिक खतांचा भडिमार करत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा अतिवापर टाळून नैसर्गिक शेतीचा आग्रह धरावा, असे आवाहन त्यांनी केले.
खतांच्या किमती स्थिर ठेवण्यात शासन यशस्वी ठरले आहे. यापूर्वी खतांची टंचाई नेहमीच निर्माण व्हायची, ऐन हंगामात खतांसाठी शेतकºयांच्या रांगा लागलेल्या आम्ही पाहिल्या़ युरियाचा वापर दुधाचे फॅट वाढवण्यासाठी तसेच हातभट्टी दारू बनवताना केला जायचा़ बहुतेक वेळा साठेबाजांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात होती . त्यामुळेच नरेंद्र मोदी सरकारने निमकोटिंग युरिया उत्पादन सुरू केले़परिणामी अन्यत्र होणारा युरियाचा वापर आता फक्त शेतीसाठीच केला जातो़ सध्या देशभर खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत़ गेल्या तीन वर्षांत युरियाचा काळाबाजारही झालेला नाही. खते मुबलक मिळत असताना केवळ दलालांची ओरड होताना दिसून येत आहे, असा टोमणा सहकार मंत्र्यांनी लगावला .
सरकारने गतवर्षी ७४ लाख क्विंटल तूर खरेदी केली. तुरीचे अधिक उत्पादन झाल्याने शेतकºयांना आधार देण्यासाठी हमीभावाने तुरीची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यंदा हरभºयाचे पीक अमाप आहे, त्याच्या खरेदीसाठी केंद्रे उघडल्याची माहिती सहकार मंत्र्यांनी दिली. गतवर्षी खरेदी केलेल्या तुरीची डाळ गरीब जनतेला स्वस्त धान्य दुकानांतून ५५ किलो दराने देण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रारंभी आपल्या प्रास्ताविक भाषणात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील कामांचा आढावा घेतला.
पुण्याच्या अभिनव फार्म्स क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांचे समूह आणि गटशेती फायद्याची या विषयावर मार्गदर्शन झाले. शेती मुबलक आहे आणि चांगला पाऊस असतानासुद्धा आपण शेतीत प्रगती करू शकत नाही, असे सांगताना शेती ही उद्योगाच्या माध्यमातून केली पाहिजे, असे बोडके म्हणाले. या महोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी, शेतकरी गट , शेतकरी मित्र , शेतकरी उत्पादक कंपनी , कृषीरत्न, उत्कृष्ट शेतकरी तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेले क्षेत्रीय कर्मचारी आणि अधिकारी यांना सहकारमंत्री व पालकमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी महापौर शोभा बनशेट्टी , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, पक्षनेते आनंद तानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार,आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, शहाजी पवार, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रतापसिंह परदेशी, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, शहर उपनिबंधक कुंदन भोळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, कृषी महोत्सव समितीचे सदस्य रवींद्र राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी मानले.
मी नको बापूच बोलतील- कृषी महोत्सव उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख होते. त्यांना अध्यक्षीय विचार मांडण्याचा आग्रह केला असता मी नको , सुभाषबापूच बोलतील असे सांगून सहकारमंत्र्यांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ दिला . या संधीचे सोने करीत सुभाषबापूंनी केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या शेतकºयांसाठीच्या योजना , आधीच्या सरकारच्या काळातील चुकीची धोरणं यावर मत मांडताना दुष्काळ ही इष्टापत्ती समजून मूठभर टँकरमाफियांनी कसा धंदा मांडला होता याकडे लक्ष वेधले.