सोलोपूर : करमाळा येथे नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतर वनविभाग अधिक सतर्क झाले आहे. मानव- वन्यजीव प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक बंदुकीचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे बिबट्याला बेशुद्ध करून पकडता येणे अधिक सोपे होणार आहे. येत्या दोन महिन्यांत ही बंदूक सोलापूर वनविभागाच्या ताफ्यात दाखल होईल अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी लोकमत शी बोलताना दिली.
राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत जिल्ह्यात मनुष्य- वन्यजीव संघर्ष कमी आहे. मात्र, करमाळा येथे झालेल्या घटनेनंतर जिल्ह्यात अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर वन्यजीवांना बेशुद्ध करून पकडण्यासाठी या बंदुकीचा वापर होईल. जिल्ह्यात सध्या एक गन पुरेशी असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
या बंदुकीमुळे दूरुनही बेशुद्ध करण्य़ाची गोळी मारता येणे शक्य आहे. प्राणी कोणता व त्याचे वजन किती आहे हे पाहून डोस किती द्यायचा, हे ठरविण्यात येणार आहे. बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करून किंवा स्थलांतर करणे सोयीचे होते. बिबट्याला गोळी लागल्यानंतर तो काही वेळाने बेशुद्ध होतो. या दरम्यान तो कुठे आहे, हे शोधण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाची मदत होणार आहे.
बंदुकीचे वजन साडेतीन किलो
वनविभागातर्फे खरेदी करण्यात येणारी बंदूक ही साडेतीन किलो वजनाची आहे. बंदुकीचा बॅरल स्टेनलेस स्टीलचा आहे. डार्टमध्ये ०.५ मिलीपासून १० मिलीग्रॅमपर्यंत भुलीचे औषध भरण्याची क्षमता आहे. बंदूक वापरताना वन्यप्राण्यांच्या जीपीएस लोकेशनसाठी सॅटेलाइट अॅँटेना कीटचा वापर करावा लागतो. गोळीमध्ये जीपीएस चिप असल्यामुळे बेशुद्ध बिबट्याचा शोध लवकर घेता येणे शक्य होईल.
राज्यातील काही भागात या अत्याधुनिक बंदुकीचा वापर करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातही या बंदुकीचा वापर करण्यात येईल. जीपीएस प्रणालीवर आधारित बंदूक मागविली असून पुरवठादारांकडून बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, वनविभाग