सोलापूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जीप चालकाने सीटबेल्ट न लावता जीप चालविल्याबद्दल सहायक उपप्रादेक्षिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी चालकास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
आरटीओ कार्यालय, शहर व ग्रामीण वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात सुरक्षा पंधरवड्यास प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ स्थळाकडे येणाºया आरटीओ कार्यालयाच्या जीपचे छायाचित्र टिपण्यात आले होते. यावेळी चालकाने सीटबेल्ट लावले नसल्याचे निदर्शनाला आले. आरटीओ आॅफिसला सीटबेल्ट नियम माफ या मथळ्याखाली छायाचित्रासह वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच याची दखल आरटीओ कार्यालयाने घेतली. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी जीपचालक प्रमोद महाडिक यांना नोटीस बजावली आहे. सीटबेल्ट न लावल्याबद्दल खुलासा सादर करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
सुरक्षा पंधरवड्यात नागरिकांना सुरक्षित वाहन चालविण्याबाबत प्रबोधन केले जात आहे. अशात हे कृत्य न शोभणारे असल्याने वाहतुकीचे नियम सर्वांना सारखे या तत्वातून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले. आरटीओ व वाहतूक़ पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई झाली.