खुडूस : नुकत्याच पार पडलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या निसटत्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून उत्तमराव जानकर यांनी प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा खा. राजू शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला. सदाभाऊ खोत यांचा माळशिरस तालुक्याने पराभव केला आहे. चळवळीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील शेतकर्यांना खोत यांनी १७० कोटी रुपये मिळवून दिले. यासाठी जेलही भोगावी लागली. परंतु त्या विकासाच्या प्रश्नावर या तालुक्यातील लोकांनी मतदान केले नाही. त्यामुळे पाच वर्षे आम्ही मागे गेलो. विकासापेक्षा भावनिकतेला पैशाला, आर्थिक दहशतीला महत्त्व देऊन या तालुक्याने इतर पाच तालुक्यावरही अन्याय केला. देशभर नरेंद्र मोदींनी जात, पात, धर्म यांची कवाडे मोडून काढली, परंतु या तालुक्यात नेमके तेच झाले. आमच्या ताब्यामध्ये ६२ ग्रामपंचायत व ११ पंचायत समिती सदस्य असूनही भावनेला महत्त्व दिले गेल्याने आम्ही मागे पडलो. याची जबाबदारी स्वीकारून मी शेतकरी संघटनेचा व राज्य उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे उत्तमराव जानकर यांनी सांगितले.
------------
पराभवाला वारस नसतो तो लावारिस असतो. मी ती जबाबदारी स्वीकारत आहे. पैसा व सत्ता दहशत, आर्थिक गुलामगिरी संपविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार, आम्ही फार मोठा कार्यकाळ गमावला आहे. खोत यांच्या पराभवाने माळशिरस तालुक्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. - उत्तमराव जानकर, उपसभापती, माळशिरस तालुका