सोलापूर : कोरोना महामारीच्या संकटामुळे सोलापूर जिल्ह्यात हॉटेल, बांधकाम, सुतारकाम, रंगारी आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या ३४ हजार परप्रांतीय मजुरांनी सोलापूर सोडले असून, अद्याप सहा हजार कामगार आपल्या गावी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गावाकडे गेलेले मजूर जर परत आलेच नाहीत तर या क्षेत्रामध्ये जिल्ह्यात मोठी पोकळी निर्माण होणार असून, ही व्हेकन्सी कशी भरून काढायची, हा व्यावसायिकांपुढे मोठा प्रश्न आहे.
कोरोना लॉकडाऊननंतर ३ जूनपासून अनलॉक १ सुरू झाले. तेव्हा विविध दुकानं, शोरूम्स आणि बहुतांश व्यवहार सुरू करण्यास परवानगी मिळाली. अद्याप हॉटेल आणि भेळ, पाणीपुरी आदी खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवानगी दिली नसली तरी लवकरच ती मिळणार आहे. जी बांधकामं पूर्ण होऊन अंतर्गत कामे करायची राहिली आहेत, ती सुरू करण्यासाठी या क्षेत्रातील व्यावसायिकांना आता कामगारांचा तुटवडा जाणवत आहे.
पंधरा ते वीस वर्षांपासून पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश येथील मजूर सोलापुरात वास्तव्यास होते. आपल्या कामाबद्दल प्रामाणिकपणा आणि कामाचा उरक यामुळे स्थानिक व्यावसायिक त्यांना आवर्जून कामं देत असत. सोलापुरातील कामं जशी वाढायला लागली तसे अधिकाधिक मजूरही आपल्या परप्रांतातून रोजीरोटीसाठी सोलापुरात येऊ लागले. जिल्हाभर हे मजूर कार्यरत होते. कोरोना लॉकडाऊनच्या काळात विशेष रेल्वेने ते गावी परतले. आणखी ६ हजार ३२५ परप्रांतीय आपल्या राज्यात जाण्यासाठी प्रतीक्षा करीत आहेत.
बांधकाम व्यावसायिकांवर परिणाम...- बांधकाम क्षेत्रात फरशी कटिंग, पीओपी, बांधकाम, गिलाव, प्लंबरसह कमी-जास्त विटा उचलणे, सिमेंट वाहणारे आदी कामे करणारे सर्वाधिक परप्रांतीय होते. सगळेच परप्रांतीय गेले असे नाही, काही परप्रांतीय कारागीर अजून सोलापुरातच आहेत. मात्र बांधकाम क्षेत्रावर त्या गेलेल्या परप्रांतीयांमुळे परिणाम होतोय, कामे संथगतीने सुरू आहेत, एवढे मात्र खरे, अशी माहिती बांधकाम व्यावसायिक सुनील फुरडे यांनी दिली.
जेव्हा सुरुवातीला हॉटेल रेस्टॉरंट सुरू होतील तेव्हा कामगारांची गरज भासणार नाही; मात्र सर्व सुरळीत झाल्यानंतर नक्कीच कामगारांची गरज लागेल, तोपर्यंत सोलापूर सोडून गेलेले परप्रांतीय पुन्हा नक्कीच सोलापुरात येतील, अशी आशा आहे. कामगारांची गरज भासल्यास नक्कीच कामासाठी कामगारांची शोधाशोध सुरु होईल. - अनिल चव्हाण, हॉटेल व्यावसायिक, सोलापूर
परप्रांतीय जेव्हा सोलापूर सोडून त्यांच्या मूळ गावी जात होते, त्यावेळी सोलापुरातील प्रत्येकाने आदराने त्यांना त्यांच्या गावी पाठवले आहे. त्यामुळे ते परप्रांतीय नक्कीच सोलापुरात येतील; मात्र ते आल्यानंतर त्यांना काम मिळेल का नाही? हे मात्र सांगता येत नाही, तोपर्यंत आपले लोक त्या प्रकारचे काम शिकतील आणि सेट होतील. परप्रांतीय गेल्याचा सोलापूरला परिणाम होणार नाही. - शरद ठाकरे,व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी हायड्रॉलिक्स, सोलापूर