सोलापूर : लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण वाढले असून, सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत ४३ हजार जणांनी डोस घेतल्याची नोंद झाली आहे.
नवरात्रीमध्ये लसीकरण घटल्याने जिल्हा प्रशासनाने जनजागरणाची मोहीम हाती घेतली आहे. लस घेतल्यानंतर कोणताही त्रास होत नाही व लसीमुळे कोरोनापासून संरक्षण मिळते, याचे महत्त्व लोकांना सांगितल्यामुळे पुन्हा लसीकरणाचा प्रतिसाद वाढला आहे. मिशन कवचकुंडलेे मोहिमेंतर्गत राहिलेल्या १६ लाख लोकांना लसीकरण करण्यासाठी घरोघरी शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
सोलापुरात महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या सहकार्याने विविध सामाजिक संस्था, व्यक्तींच्या माध्यमातून या मोहिमेला गती देण्यात आली आहे. सोमवारी मिशन कवचकुंडले अभियानात सोलापूर जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर राहिला आहे. आता लसीकरणाला आणखी प्रतिसाद वाढणार आहे. रात्री दहा वाजेपर्यंत आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. त्याचबरोबर गावोगावच्या ठिकाणी विशेष मोहीम घेण्यात येत आहे.
असे झाले लसीकरण
- मुंबई : ८९३८८
- ठाणे : ७४३४१
- पुणे : ७२५०२
- नाशिक : ६०३४७
- सोलापूर : ४३३८४
प्रतिसाद वाढतोय...
मिशन कवचकुंडलांतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेल्यांसाठी गावोगाव विशेष मोहीम घेण्यात येत आहे. त्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत आरोग्य केंद्रं सुरू राहतील. सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत २०३ केंद्रांवरून ४३ हजार ३८४ जणांनी डोस घेतला. प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी
लोकांनी लस घ्यावी
अद्याप एकही डोस न घेतलेल्यांनी जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊन लस घ्यावी. लस घेतल्याने कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळते. लागण झाली तरी तीव्रता जाणवत नाही. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. लोकांनी प्रतिसाद द्यावा.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी