पंढरपूर : लसीकरण नियोजनबद्ध व्हावे, रांग न लागता, कुणालाही मनस्ताप न होता सर्वांना लस मिळावी यासाठी एक खास प्लॅन तयार करण्यात आला आहे. शुक्रवार १४ मेपासून त्याची अंमलबजावणी होत आहे.
पंढरपूर शहरातील लसीकरणाबाबत होत असलेल्या अनागोंदी कारभारावर उपाययोजना करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपविभागीय अधीक्षक विक्रम कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाचा स्वतंत्र आराखडा तयार केला आहे.
नवीन प्लॅननुसार पहिल्या टप्प्यात केवळ दुसरा डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यांनी पहिली लस घेतली आहे अशा सुमारे ३७०० लोकांची यादी प्रशासनाकडे आहे. ज्यांनी विविध हॉस्पिटलमध्ये लस घेतली आहे, अशा सर्वांची यादी एकत्रित करून त्या लस घेतल्याच्या दिवसाच्या क्रमवारी प्रमाणे त्यांच्या नावांच्या याद्या जाहीर केल्या जातील. दररोज सुमारे १५० लोकांची यादी जाहीर केली जाईल. ज्यांचे नाव त्या यादीत आहे अशा लोकांनी लसीकरण केंद्रावर येऊन लस घ्यायची आहे. लिंक रोडजवळील अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये हे लसीकरण होणार आहे.
मागील काही दिवसांत पंढरपुरात लसीकरणात गोंधळ झालेला पाहावयास मिळाला होता. तसे होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसार नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या याद्या संध्याकाळीच प्रकाशित केल्या जातील. या यादीमध्ये नाव असलेल्या व्यक्तीनेच लसीकरण केंद्रावर जायचे आहे, अन्य कोणत्याही नागरिकाला त्या दिवशी लस दिली जाणार नाही.
दुसऱ्या डोसचा निर्धारित कालावधी जर संपून गेला तर पुन्हा नागरिकांना पहिला डोस घ्यावा लागणार आहे. अतिरिक्त ताण पडेल म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य असेल. कुठेही रांग लागू नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
---
ज्येष्ठ नागरिकांना बाकडे...
एका बेंचवर एक नागरिक अशा पद्धतीने दोन ते तीन वर्गांमध्ये नागरिकांना बसविण्यात येईल. त्यांना तेथे त्यांच्या जवळ जाऊन लस दिली जाईल. त्यामुळे कुठेही रांग लागणार नाही. या शाळांमध्ये शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त असेल.
---
नियमबाह्य लसीकरण करणाऱ्यांवर नजर
मागील काही दिवसांत अधिकारी, नगरसेवक यांनी संगनमत करून जवळच्या व्यक्तींना लस दिल्याचे आरोप केले जात होते. आता हा प्रकार थांबविण्यासाठी कुठल्याही नगरसेवकाने किंवा प्रशासनबाह्य व्यक्तीने या लसीकरणांमध्ये हस्तक्षेप करू नये यासाठी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख पथकातील काही सदस्य लक्ष ठेवणार आहेत. नियमबाह्य हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.