सोलापूर : सर्वाधिक कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील शंभर गावांत शंभर पथके पाठवून लसीकरण मोहीम गतिमान करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून या गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण करून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लोकमतला दिली.
लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून सोमवारपासून ग्रामीणसह शहरी भागात लसीकरण मोहीम आणखीन गतिमान होणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभाग प्रमुखांची चर्चा झाली असून जिल्हाधिकारी, एसपी, जिल्हा परिषदेचे सीईओ, प्रांताधिकारी, तहसीलदार, बीडीओ, पोलीस ठाणे प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शंभर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहेत. सोमवारपासून ही पथके कार्यान्वित हाेतील. या पथकांचे नेतृत्व जिल्हाधिकारी शंभरकर हे स्वत: करतील. शंभरकर हे स्वत: काही गावांमध्ये ठाण मांडून लसीकरणावर नजर ठेवणार आहेत. त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते याही काही गावांमध्ये जाणार आहेत.
या शंभर गावांमध्ये लसीकरण मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी संबंधित पथक प्रमुखांची राहणार आहे. संबंधित गावातील लसीकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सक्त सूचना आहेत. सोलापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी फक्त पस्तीस टक्के नागरिकांनी दोन डाेस घेतले आहेत. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या केवल साठ ते सत्तर टक्के आहे. साठ ते सत्तर टक्क्यापेक्षा कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील शंभर गावांची निवड जिल्हा प्रशासनाने केली असून या गावांमध्ये सोमवारपासून लसीकरण मोहीम राबविण्यासाठी शंभर पथके रवाना होतील, असे शंभरकर यांनी सांगितले.
पथकासोबत पोलीस
प्रत्येक पथकात दोन आरोग्य कर्मचारी, आरोग्य अधिकारी तसेच त्यांच्यासोबत दोन सहायक असतील. लसीकरण दरम्यान गावात दमदाटी होऊ नये. यासाठी प्रत्येक पथकात एक पोलीस कर्मचारी देखील उपस्थित राहणार आहे. पथकासोबत पोलीस कर्मचारी जोडून देण्याची जबाबदारी एसपी कार्यालयाला देण्यात आली आहे.
ओमायक्रॉनचा धसका, रोज पन्नास हजार लसीकरण
ओमायक्रॉनचा धोका सर्वत्र निर्माण झाल्याने सर्वत्र लसीकरण मोहीम गतिमान करण्यात आली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती सर्वत्र पसरली असून लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. रोज पन्नास ते साठ हजार नागरिक लस घेत आहेत. लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना शासकीय नागरी सुविधा न देण्याचा निर्णय देखील जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे लोक भीतीने लसीकरण केंद्रावर गर्दी करताहेत. लस घेऊन कोरोनापासून सुरक्षित रहा, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दोन बीअर शॉपीवर कारवाई
मास्क न वापरल्याबद्दल तसेच लसीकरण करून न घेतल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापुरातील दोन बीअर शॉपीवर दंडात्मक कारवाई केली आहे. प्रत्येकी दहा हजारांचा दंड केला आहे.