यावेळी बोबडे यांनी टेंभुर्णी आरोग्य केंद्रात लसीकरणाचा सावळागोंधळ चालू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, सरपंच व काही ग्रामपंचायत सदस्य हे स्वतःचे नातेवाईक व गटाचे कार्यकर्ते यांचीच बोगस यादी बनवून लसीकरण करीत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे लसीची मात्रा कमी कमी देऊन राहिलेली लस काही आरोग्य कर्मचारी पाचशे ते सातशे रुपये घेऊन खासगीत विक्री करीत आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे. लस आल्याचे समजताच ग्रामपंचायत प्रशासनातील काही लोक जवळच्या माणसांचे रजिस्ट्रेशन करतात. शनिवारी लसीकरण चालू असताना जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरजा बोबडे, भाजपा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे व ग्रामपंचायत सदस्य जयवंत पोळ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे बोबडे यांनी सांगितले. संग्राम देशमुख यांनी एका आरोग्य कर्मचा-याने प्रत्येकी सातशे रुपये घेऊन लस दिल्याचा आरोप केला.
याबाबत ग्रामसेवक मधुकर माने यांनी आज लसीकरणासाठी यादी दिली नाही लेखी दिले आहे. तसेच यापूर्वीही कधी दिली नाही. मग लसीकरण कोणत्या निकषानुसार व कोणाच्या सांगण्यावरून होत आहे असा प्रश्न बोबडे यांनी उपस्थित केला आहे.
......
ग्रामसेवकास वारंवार यादी मागूनही दिली जात नाही. मला खूप काम आहे असे सांगून त्यांनी यादी देण्याचे टाळले. मला दोन वेळा कोरोना संसर्ग झाला होता. त्याकाळात मी रजेवर होतो. या काळात काही आरोग्य कर्मचा-यांनी गैरकृत्य करून लस दिली असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल.
-डॉ. नंदकुमार गुळवे
वैद्यकीय अधिकारी, टेंभुर्णी
......
आम्ही अशी बोगस यादी करत नाही. आमच्यावर असे आरोप होतात, म्हणून तर आम्ही तालुका वैद्यकीय अधिका-यांकडे मागणी केली आहे की ग्रामपांचायतीकडे हे काम न देता सर्व नोंदणी ऑनलाईन करावी.
प्रमोद कुटे
सरपंच, टेंभुर्णी