मोहोळ : शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून होणारे कोरोना प्रतिबंधक लसीकरण आता नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार आहे. लवकरच ज्या नागरिकांनी पहिली लस घेतली आहे त्यांनाच प्राधान्याने दुसरी लस दिली जाईल.
हे लसीकरण सुलभरित्या होण्यासाठी पंढरपूर येथे राबविलेला पॅटर्न येथे राबवणार आहेत, या महामारीला रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे प्रशासक तथा पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव थोपविण्यासाठी व लसीकरणाची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी नगरपरिषदेचे प्रशासनाधिकारी सचिन ढोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्याधिकारी एन. के. पाटील, अभियंता महेश माने उपस्थित होते. यावेळी प्रशासनाधिकारी ढोले म्हणाले, शहरामध्ये प्रथम प्राधान्य कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिले जाईल. लसीकरणाच्या वेळेला होणारा गोंधळ, नागरिकांना ऊन-वाऱ्याचा होणारा त्रास वाचविण्यासाठी पहिल्यांदा लसीकरण नोंदणी केंद्र सुरू केले जातील. त्यामध्ये संबंधित नागरिकांचे नाव, वय, आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर घेतला जाईल. ---
शाळा महाविद्यालय ताब्यात घेणार
शहरातील शाळा महाविद्यालयाच्या काही खोल्या ताब्यात घेऊन स्वच्छता केली जाणार आहे. त्या- त्या दिवशी उपलब्ध होणारी लस व नोंदणी केलेल्या नागरिकांची संख्या लक्षात घेता विशिष्ट संख्येचे गट करून नोंदणी केलेल्या नागरिकांना कुठे लस उपलब्ध आहे. त्यांचा मेसेज व फोनही केला जाणार आहे.