टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची रीघ लागलेली असते. त्यामुळे शहरातील सुमारे ३० हजार व टेंभुर्णी अंतर्गत गावातील सुमारे २० हजारांच्या अशी ५० हजारांच्या घरात लोकसंख्या आहे. १२ फेब्रुवारी ते ५ एप्रिल या कालावधीत फक्त १७९९ नागरिकांना लस दिली आहे. लस देण्याची गती वाढवण्याची नागरिकांची मागणी आहे.
अपुरा कर्मचारीवर्ग
टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत टेंभुर्णीसह अकोले, शेवरे, माळेगाव, कन्हेरगाव सूर्ली, फुटजळगाव, दहिवली या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांतील ५० हजार लोकसंख्येस टेंभुर्णी आरोग्य केंद्रांमधून आरोग्य सेवा पुरविली जाते. त्यातच अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे त्यांच्यावर ताण आहे. टेंभुर्णी आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील सहा उपकेंद्रे आहेत. टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत ५१३० रॅपिड ॲण्टिजेन तर १ हजार ७३३ आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये १३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज सुमारे १५० कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. मार्च महिन्यात टेंभुर्णी शहरात ९९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये मोठी वाढ झाली. सहा दिवसांत ४८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.
दररोज २५० रुग्णांवर उपचार
सध्या टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राची धुरा डाॅ. नंदकुमार घोळवे, डॉ. अमोल माने व डॉ. विक्रम रेळेकर आपल्या उपलब्ध सहकाऱ्यांसह सांभाळत आहेत. येथील आरोग्य केंद्रातील दररोजची ओपीडी २०० ते २५० एवढी असते. टेंभुर्णी शहरात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता येथील आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, अशीही मागणी नागिरकांमधून होऊ लागली आहे.