सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) तर्फे घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला़ या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात राहणारा वैभव नवले हा राज्यात प्रथम आला आहे. अहमदनगर येथील ज्ञानदेव काळे हा मागास प्रवर्गातून प्रथम आला आहे. सातारा जिल्ह्यातील दिपाली कोळेकर ही महिला गटात राज्यात प्रथम आली.
वैभव नवले हा मुळचा करमाळा शहरातील असून त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे करमाळ्यातच पूर्ण झाले आहे. प्राथमिक शिक्षण करमाळा शाळा नंबर ३ येथे झाले़ पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण झाले़ त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले़ २०१६ साली झालेल्या पीएसआय परीक्षेत त्याला अपयश आले होते. केवळ 1 मार्काने त्याचा पीएसआय पदाचा नंबर हुकला होता. मात्र, अपयश ही यशाची पहिली पायरी मानून वैभवने पुन्हा लढाईला सुरुवात केली. जिद्द आणि कष्ट यापुढे कधी-कधी नियतीलाही झुकावे लागते, तसेच वैभवच्या बाबतीत घडले. केवळ एका मार्काने पीएसआयची पोस्ट गमावलेला वैभव 2018 च्या पीएसआय परीक्षेत राज्यात प्रथम आला.
सन २०१८ साली घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेत त्याने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यामुळे, सन 2016 मध्ये 1 मार्काने हुकला अन् 2018 च्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. वैभवच्या या यशाने त्याच्या आई-वडिलांना अत्यानंद झाला आहे. वैभवचे वडिल एसटी विभागात क्लार्क पदावर कार्यरत होते. गेल्याचवर्षी ते आपल्या सेवेतून निवृत्त झाले होते. त्यामुळे, वैभवचे यश त्यांच्यासाठी मोठी उपलब्ध ठरलीय. तर, वैभवच्या आईनेही औक्षण करून लेकाच्या यशाचा आनंद साजरा केला. वैभवने राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याची बातमी कळताच, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांनी पेढे वाटून, गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.