वैराग : तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या प्रयत्नातून सुकर झाला आहे. अंतिम मंजुरीकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत व सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबतची पत्रकार परिषद वैराग येथे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली. या वेळी सावंत म्हणाले, दिलीप सोपल हे २००३ साली जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असताना तेथील मंजुरी घेऊन प्रस्ताव पाठवला होता. मात्र तो पुणे येथील आरोग्य उपसंचालकाकडे पडून होता. तो वैराग येथील अमरराजे निंबाळकर यांनी पाठपुरावा करून राहिलेल्या त्रुटींची पूर्तता केल्याने जानेवारी महिन्यात आरोग्य सचिवाकडे आला. बुधवारी सोपल यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे जाऊन आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवून अंतिम मंजुरीकरिता मुख्यमंत्री कार्यालयाकडे वर्ग केल्याने लवकरच लाल फितीत अडकलेल्या वैराग ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळणार आहे.
या वेळी प्रवीण काकडे, समीर शेख, समाधान पवार, शलाका पाटील, प्रवक्ते आनंद गवळी, आबासाहेब देवकर, मारुती जिरंगे उपस्थित होते.
---
आठ दिवसांत अंतिम मंजुरी मिळवू : खा. निंबाळकर
पत्रकार परिषदेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण काकडे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना भ्रमणध्वनीवरून ग्रामीण रुग्णालयाची माहिती सांगितली. या वेळी निंबाळकर यांनी माजी मंत्री सोपल व मी मुख्यमंत्र्यांकडे प्रत्यक्ष जाऊन आठ दिवसांत अंतिम मंजुरी मिळवून घेतो, असे सांगितले.
-----------
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रत्यक्षात भेट घेऊन वैरागच्या ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी घेतली आहे. ती मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीकरिता पाठवून दिली आहे. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणे चालू होते. त्याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. वीज तोडणी थांबविण्याचे आदेश काढले आहेत.
- दिलीप सोपल
---
फोटो : २७ वैराग
आरोग्यमंत्र्यांची मंजुरी घेऊन मुख्यमंत्र्यांकडे फाइल पाठवताना आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार संजय मामा शिंदे, अरुण कापसे, अरुण सावंत, अमर निंबाळकर, नंदकुमार रणदिवे.