वैराग : चाळीस हजार लोकसंख्या असणाऱ्या वैराग शहराने एकीचे दर्शन घडवत ग्रामपंचायतीचा एकही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने वैरागकरांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार यशस्वी केला आहे.
ग्रामदैवत संतनाथ मंदिरामध्ये अरुण सावंत, संतोष निंबाळकर, निरंजन भूमकर या प्रमुख पॅनल प्रमुखांसह ग्रामस्थांनी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकत तत्काळ नगरपंचायत अंमलात आणण्याची मागणी केली होती. २७ डिसेंबर रोजी अर्ज भरण्याचा संतनाथ महाराजांना साक्षीला स्मरून शपथ सोहळा झाला. त्यानंतर संतोष निंबाळकर, निरंजन भूमकर, अरुण सावंत या तीन पॅनल प्रमुखांनी ग्रामपंचायत जवळ एक समिती बसवली. बार्शी येथे हे तिघेजण अर्ज भरण्याच्या जागेवर ठाण मांडून बसले होते. बहुतांश प्रमुख इच्छुकांनी गावाच्या विकासाकरिता म्हणून अर्ज दाखल केला नाही. काहींजण अर्ज भरण्यासाठी इच्छुक होते. त्यांना नगरपंचायतीचे महत्त्व, तसेच होणारा खर्च, वेळ, शासनावर येणारा ताण याबाबत त्यांनी जनजागृती केली. त्यामुळे चाळीस हजार लोकसंख्या असणाऱ्या गावाची एकी इतरांना आदर्शवत ठरली आहे.