वैराग ग्रामपंचायतची नगरपंचायत म्हणून उद्घोषणा झाली आहे. तसेच नगरविकास विभागाने निवडणूक कार्यक्रम रद्द करावा, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली आहे. मात्र या विनंतीला आयोगाने गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम चालूच आहे. या पार्श्वभूमीवर रविवार ग्रामदैवत संतनाथ महाराजांच्या मंदिरात सर्व राजकीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी बैठक बोलावली होती.
यावेळी राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर, भाजपचे संतोष निंबाळकर व अरुण सावंत या मुख्य पॅनल प्रमुखांसह सर्व इच्छुक व उपस्थित नागरिकांनी ग्रामदैवत संतनाथ महाराजांची शपथ घेऊन प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन कोणीही अर्ज दाखल करावयाचा नाही, असे ठरले. तसेच नगरपंचायतीच्या प्रक्रियेला सर्वांनी पाठिंबा जाहीर केला. एकदा निवडणूक झाली तर किमान अडीच वर्षाचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. नगरपंचायत झाली तर सर्वाचाच वेळ, पैसा, श्रम वाया जाणार आहे. तसेच निवडणूक विभागावरपण आर्थिक भार पडणार आहे. त्यामुळे शहराच्या हितासाठी कोणीही निवडणूक रिंगणात उतरू नये, असे सर्वानुमते ठरले.
यावेळी माजी शिक्षण सभापती मकरंद निंबाळकर, राजकुमार पौळ, अहमद चौधरी, मारुती जिरंगे, किशोर देशमुख, चंद्रकांत तावसकर, समीर शेख आदींसह नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो
२७ वैराग०१
वैराग येथील श्री संतनाथ मंदिरात सध्याच्या ग्रामपंचायत प्रक्रियेस विरोध करण्यासाठी आयोजित बैठकीत चर्चा करताना पॅनलप्रमुख व ग्रामस्थ.
२७वैराग०२
वैराग ग्रामपंचायत निवडणुकीस विरोध करण्यासाठी एकत्र आलेले सर्व पॅनलप्रमुख.