बाळासाहेब बोचरेसोलापूर दि १४ : कळत नकळत एचआयव्हीची शिकार झालेल्या अन् समाजाच्या प्रेमाला पारखे झालेल्या एचआयव्हीग्रस्त मुलांमुलींनी एकत्र येत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत विवाहाच्या रेशीमबंधात सामावून घेण्याचा निर्णय घेत खºया अर्थाने व्हॉलेंटाईन डे साजरा केला. एचआयव्ही बाधित हीच आपली जात समजून जात- धर्माच्या भेदाला छेद देत एकत्र आलेल्या या विवाहेच्छुकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे अशा बाधितांच्या वधू-वर मेळाव्यात सहा जोड्यांच्या विवाहाची सुपारी फुटली गेली. एचआयव्ही बाधितांसाठी काम करणारी ‘विहान’ही स्वयंसेवी संस्था व त्यांच्या जोडीने काम करणारी संकल्प फौंडेशन ही युवकांची फळी. यांनी मिळून यंदा व्हॅलेंटाईन डे आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. एचआयव्ही बाधित विवाहेच्छुकांना त्यांनी आवाहन करुन त्यांची माहिती संकलित केली आणि त्यांचा मेळावा सोलापुरातील इम्पिरियल हॉलमध्ये भरवला. मेळाव्यात सोलापूर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, कोल्हापूर,लातून येथून ५९ पुरूष आणि १८ मुलींनी हजेरी लावून आपला परिचय दिला आणि परिचय देताना जात या विषयावर अनेकांनी बोलणे टाळले. एचआयव्ही बाधित हीच आपली जात असे त्यांनी उजळमथ्याने सांगितले. आज जमलेल्या सहा जोड्यांपैकी चार जोड्या या आंतरजातीय असून त्यापैकी दोन हे बिजवर आहेत. दोन जोड्यांना त्यांच्या स्वत:च्या जातीचा जोडीदार मिळाले. प्रत्येक जोड्यांना एकत्र बसवून एकमेकांची सविस्तर माहिती देवनू चारचौघात लग्ने जमविण्यात आली. लवकरच या जोड्यांचा विवाह लावून देण्याची जबाबदारी संकल्प फौंडेशनने घेतली आहे. मेळाव्याला आमदार प्रणिती शिंदे, सोलापूर एआरटी सेंटरच्या प्रमुख डॉ. अग्रजा चिटणीस, जिल्हा एडस् नियंत्रण संस्थेचे प्रमुख भगवान भुसारी, अॅड. शीलाताई मोेरे, अॅड. मंगला चिंचोळकर, मुंबई प्रदेश कॉग्रेस मानवाधिकार सेलचे प्रमुख इस्तियाकबी जहागीरदार यांनी मार्गदर्शन केले. शाब्दी सोशल ग्रुपचे रसूल पठाण यांनी मोफत जेवण दिले. शौकत पठाण व नगरसेविका फिरदोस पटेल यांनी मोफत हॉल उपलब्ध करुन दिला. हा मेळावा पार पाडण्यासाठी विहानचे कार्यक्रम संचालक समाधान माळी,अॅड. बसवराज सलगर,अध्यक्षा राणी श्रीनिवास वल्लमदेशी, कार्यक्रम समन्वयक ब्रह्मदेव श्रीमंगले, संकल्प फौंडेशनचे किरण लोंढे,पूजा काटकर, श्रध्दा राऊळ, दत्ता गाकयवाड,नागनाथ दुपारगुडे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी एचआयव्हीग्रस्त विवाहेच्छुकांचे मनोमीलन घडवून आणण्यात मोलाचे परिश्रम घेतले.