काशिनाथ वाघमारे सोलापूर : मध्य रेल्वे आणि सामाजिक वनीकरण विभाग यांनी मीटरगेज रेल्वेच्या २४ एकर जागेवर वनराई फुलवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ स्मृती उद्यानासमोरील जागेवर ही वनराई १ ते ३१ जुलै २०१८ दरम्यान ७ हजार ७०० वृक्ष लागवड करुन फुलवली जाणार आहे़ यामुळे शहराच्या हिरवाईत भर पडणार आहे, तापमान घटवण्यासही काहीअंशी मदतच होणार आहे़
१ ते ३१ जुलै दरम्यान शासन राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवड करीत आहे़ या योजनेंतर्गत स्मृती उद्यानासमोर झाडे लावली जात आहेत़ प्राथमिक स्तरावर अक्षय्यतृतीयेच्या दिनी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा, वृक्षमित्र सुभेदार बाबुराव पेठकर यांच्या उपस्थितीत सात झाडे लावून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे़
जेसीबीने पावसाळ्यापूर्वी ७ हजार ७०० खड्डे खोदून घेण्यात आले आहेत़ अधूनमधून पडणाºया अवकाळीमुळे खड्डे पाण्याने भरणार आहेत आणि या ठिकाणी वृक्षलागवड करणे सोपे होणार आहे़ १ ते ३१ जुलै दरम्यान या २४ एकरावर सर्व झाडे लावली जाणार असून वृक्षलागवडीनंतर ‘ठिबक सिंचन’ द्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे़ याची जबाबदारी सामाजिक संस्था उचलत आहे़
स्थानिक प्रजातीची वृक्षलागवड - हवेतील उष्णता कमी करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी आणि भरपूर शुद्ध हवा मिळावी या हेतूने स्थानिक प्रजातीची झाडे लावण्याचा विचार केला गेला आहे़ यामध्ये वड, पिंपळ, बकूळ, गुलमोहर, कडूलिंब अशी स्थानिक प्रकारची झाडे लावली जाणार आहेत़ बाजूला स्मृतिवन आणि समोर हिरवाई असे ग्रीन सोलापूरचे समीकरण अनुभव या उपक्रमातून अनुभवाला येणार आहे़
१ ते ३१ जुलै दरम्यान राज्य सरकार १३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबवत आहे़ या मोहिमेंतर्गत स्मृती उद्यानासमोरील रेल्वेच्या शिल्लक जागेवर अर्थात ७ हेक्टरवर ७,७०० झाडे लावली जाणार आहेत़ जिल्ह्यातील मोठा उपक्रम राहणार आहे़ - सुवर्णा माने, उपसंचालक, सामाजिक वनीकरण
रेल्वेच्या रिक्त जागेवर सामाजिक वनीकरणाच्या सहकार्यातून वनराई फुलत आहे़ एकूण रिक्त जागेपैकी जवळपास २४ एकर जागेवर अर्थात ७ हेक्टरवर झाडे लावली जात आहेत़ मध्य रेल्वेने ही जमीन साफ करुन दिली आहे़ खड्डे खोदून तयार आहेत़ - संजय अर्धापुरे, स्टेशन उपप्रबंधक तथा समन्वयक