सोलापूर/मुंबई - मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रात धावण्यास सुरुवात होऊन आता १ महिना पूर्ण होतंय. या एक्सप्रेससाठी पहिल्या काही दिवसांत हौशी प्रवाशांनी गर्दी केली होती. तेव्हा वंदे भारत एक्स्प्रेसमधील जेवण, नाष्ता आदींची चवही चाखली गेली. ती काही फारशी लोकांना आवडली नाही. अनेकांना तर आपल्यासोबत भेदभाव झाल्याचे दिसून आले. त्यातच, तिकीट दरही जास्ती असल्याने या ट्रेनने प्रवास करण्याचा आनंद क्षणिक किंवा तात्काळ म्हणूनच होऊ लागला आहे. दरम्यान, बुधवारी या ट्रेनमध्ये प्रवाशांना देण्यात आलेले बिस्कीटे ही एक्सपारी डेट पूर्ण केलेली असल्याचे सांगत प्रवाशाने संताप व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा बावटा दाखवून सुरू केलेल्या मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सर्वत्र कौतुक होत असताना याच गाडीत प्रवाशांना चहासोबत दिली जाणारी बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची असल्याचा प्रकार समोर आला. यासंदर्भात एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रारही नोंदविली आहे.
सोलापूरहून मुंबईला निघालेल्या याच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट खानपान सेवेचा अनुभव प्रवाशांना आला. नागेश पवार हे सोलापूरहून मुंबईला याच गाडीतून प्रवास करीत होते. विशेष म्हणजे सकाळी १५ मिनिटे उशिराने वंदे भारत एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक सोडले. पुढे काही वेळातच प्रवाशांना खानपान सेवेचा भाग म्हणून चहा-बिस्किटे देण्यात आली. परंतु चहासोबत दिलेली बिस्किटे उत्सुकतेपोटी न्याहाळली असता ही बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची आढळून आल्यामुळे प्रवाशांना धक्का बसला. त्याचा अनुभव नागेश पवार या प्रवाशाला प्रत्ययास आला. तेव्हा त्यांनी तेवढ्याच सजगतेने रेल्वे प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार नोंदविली. यासंदर्भात पवार यांनी तक्रारीची चित्रफित तयार करून समाज माध्यमातून प्रसारीत केली. यात चहासोबत त्यांना देण्यात आलेल्या बिस्किटाच्या पाकिटावर बिस्किटाची उत्पादन केल्याची तारीख २६ ऑगस्ट २०२२ आहे. तर कालबाह्य तारीख २५ फेब्रुवारी २०२३ अशी आहे. मात्र, ही बिस्कीटे त्यांना ८ मार्च दिनी देण्यात आली आहेत. त्यामुळे, प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान, प्रवाशांमध्येही समाधान असून ट्रेनलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १० फेब्रुवारी रोजी मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. संपूर्ण वातानुकूलित, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त, आरामदायी आणि मध्यम जलदगती गाडी म्हणून वंदे भारत एक्सप्रेसचे सर्वत्र उत्सवी थाटात, मोदी-मोदीची घोषणाबाजी करत, वाजत-गाजत स्वागत करण्यात आले होते.