सोलापूर :
मुंबई- सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस गाडी दहा फेब्रुवारीपासून धावणार असून ही गाडी एकशे दहा किलोमीटर गतीने धावणार आहे. सोलापूर ते मुंबई रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळाची क्षमता एकशे वीस किमी स्पीडची असून या मार्गावर वंदे भारत एकशे दहा किमी स्पीडने धावणार आहे. रुळाची क्षमता वाढवण्यापूर्वीच वंदे भारत गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रुळाच्या दुरुस्तीसह इतर कामे मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर सुरू आहेत. साेळा डब्यांच्या या वातानुकूलित गाडीला एकूण सात ठिकाणी थांबे दिले आहेत.
पहिल्या आठवड्यात ही गाडी ट्रायल बेसवर धावणार आहे. यात गाडीचा वेग, नियोजित वेळापत्रक, प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळेल याची चाचपणी होईल. त्यानंतर गाडीच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. मुंबईहून सोलापूरकडे यायला या गाडीला साडे सहा तास लागणार असून यात वेळेची कपात करण्याच्या दृष्टीने रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. वंदे भारतची गती प्रतिसाद १८० किमी आहे; परंतु मुंबई ते सोलापूर मार्गावरील रुळाची क्षमता केवल एकशे वीस किमी आहे. त्यामुळे ही गाडी एकशे दहा ते एकशे वीस किमीने धावणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता सीएसटी रेल्वे स्थानकावर वंदे भारतचे उद्घाटन होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन कार्यक्रम सोलापूरहून ऑनलाइन होण्याची शक्यता आहे. सोलापूर रेल्वे प्लॅटफॉर्मवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. ११ फेब्रुवारीपासून सोलापुरातून रोज सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी वंदे भारत गाडी मुंबईकडे धावणार आहे. मुंबई, दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डूवाडी तसेच सोलापूर या सात ठिकाणी गाडी थांबणार आहे.