११ फेब्रुवारी २०२१ रोजी अनोळखी मृतदेह दोन्ही पाय व कमरेला सुताच्या दोरीने बांधलेल्या अवस्थेत जैनवाडी (ता. पंढरपूर) येथील नीरा भाटघर कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात सापडला होता. पोलिसांना माळशिरस पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग व्यक्तीचे व जैनवाडी येथील कॅनॉलमध्ये सापडलेल्या मयत व्यक्तीचे वर्णन मिळते जुळते वाटले. यामुळे त्यांनी हरवल्याची तक्रार देणाऱ्या संजय सिदाम चंदनशिवे (रा. कमलापूर, ता. सांगोला) यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर तो मृतदेह सुरेश गणपत कांबळे (वय ४५, रा. पिंपळे गुरव, ता. हवेली, जि. पुणे) याचा असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले.
मयत व्यक्ती सुरेश गणपत कांबळे हा गारवाडपाटी येथील हॉटेल अहिल्यामध्ये कूक (वस्ताद) म्हणून गेली १० ते १५ वर्षांपासून काम करीत होता. परंतु अलीकडे त्यास दारूचे व्यसन लागल्याने तो नेहमी दारू पिऊन हॉटेल मालक व त्यांच्या घरातील लोकांना शिवीगाळी करीत होता. यामुळे भाऊ मामा हुलगे, मामा भानुदास हुलगे, हणमंत निवृत्ती गोरड (सर्व रा. गोरडवाडी, ता. माळशिरस) यांनी ४ फेबुवारी २०२१ रोजी रात्री सुरेश कांबळे हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील खोलीत झोपलेला असताना त्याचा गळा आवळून त्यास ठार मारले. न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोनि. प्रशांत भस्मे यांनी सांगितले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम करीत आहेत.