आप्पासाहेब पाटील
सोलापूर : कलापथक, वासुदेव, पोतराज, लावणी अशा अनेक लोककला ग्रामीण भागात संवादाचे साधन आहेत. मनोरंजनातून यथायोग्य संदेश देणं, हे या लोककलांचे वैशिष्ट्य. हाच हेतू समोर ठेवून जिल्ह्यात शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यात येत आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी केले आहे.
लोककलावंतांच्या पारंपरिक लोककलेतून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने व सामाजिक न्याय विभाग यांच्या सौजन्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या माध्यमातून गावकऱ्यांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
शासनमान्य यादीवरील जिल्ह्यातील जय भवानी सांस्कृतिक मंडळ, मु. पो. जवळा (ता. सांगोला), मंचक कलापथक सांस्कृतिक मंडळ, खुनेश्वर, ता. मोहोळ, महात्मा फुले ग्रामीण विकास संस्था, निंबोणी, ता. मंगळवेढा, भैरव मार्तंड जागरण गोंधळ व सांस्कृतिक कलामंच आणि कै. अरविंद सोनवणे बहुउद्देशीय संस्था सांस्कृतिक कलापथक (दोन्ही संस्था पंढरपूर), सुंदर कलापथक, स्वरसंगम कलापथक लोकनाट्य बहुउद्देशीय संस्था, नटराज बहुउद्देशीय व संशोधन संस्था, (तिन्ही संस्था सोलापूर) ही आठ कलापथके हे कार्यक्रम सादर करत आहेत.