सांगोला : चोरट्यांनी लॉकडाऊनची संधी साधत बाजार पेठेवर लक्ष केले आहे. तालुक्यात जवळा येथे एकाच रात्रीत सराफ दुकानासह चार ठिकाणी घरे फोडली. मात्र, सराफाच्या दुकानातील तिजोरी न फुटल्याने चोरट्यांनी माेर्चा बंद घरांकडे वळवला. दोन घरांतून दागिन्यांसह रोख २ हजार असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज पळविला.
१५ एप्रिलच्या मध्यरात्री जवळा (ता. सांगोला) येथील चांदणी चौक - आंबेडकरनगरदरम्यान चोरीचे प्रकार घडले. या घटनेने गावात भीतीचे वातावरण आहे. याबाबत शोभा आकाश बनसोडे (रा. जवळा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार चोरट्यांनी मोर्चा गावातील राम सुरवसे, भगवान सुरवसे यांच्या घराकडे वळविला. त्यांच्या बंद घरे फाेडले, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर त्यांनी दत्तात्रय चौगुले यांच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटला. त्यांच्या कपाटातून दोन हजारांची रोखड पळवली. तसेच आंबेडकरनगर येथील शोभा बनसोडे यांचे घर फोडून कपाटातील सोन्याच्या चार अंगठ्या, तीन हजारांचा बिचवा, मासुळ्या असा ३३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
----
...अन प्रयत्न फसला
लॉकडाऊनमुळे बरीच दुकाने बंद आहेत. जवळा गावात विजय साळुंखे-पाटील यांचे चांदणी चौकात अंबिका ज्वेलर्स दुकान आहे. चोरटे गुरुवारी मध्यरात्री पाटील यांचे सोन्याचे दुकान फोडून आत प्रवेश केला. मात्र, त्यांना तिजोरीच फटली नाही. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला.
----
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दरम्यान तीन चोरटे रात्री जुन्या पेठेतून फिरत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. काही लोकांनी पोलिसांना याची माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
---
जवळ्यातील घरफोड्यांची माहिती मिळाली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही समजले आहे, त्याचा तपास चालू असून तो हेड कॉन्स्टेबल भोसले यांच्याकडे दिला आहे. सध्या बंदोबस्ताची जबाबदारी वाढली असून घरफोड्या उघडकीस आणण्याबाबत तपास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
-भगवानराव निंबाळकर, पोलीस निरीक्षक, सांगोला पोलीस ठाणे
---
फोटो : १५ जवळा
जवळ्यात लॉकडाऊन काळात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष केले आहे.