पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. विठ्ठल भक्तांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी केली आहे. यामुळे विठ्ठलाची दर्शन रांग रिकामी आहे. दर्शन रांगेत भाविक नसल्याकारणाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाºया ६ वीणेकºयांपैकी चिठ्ठीद्वारे एकाची निवड मानाचा वारकरी म्हणून करण्यात आली आहे. या मानाच्या वारकºयाचे नाव विठ्ठल ज्ञानदेव बडे (वय ८४, रा. मु. पो. चिंचपूर- पांगूळ, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असून त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शासकीय महापूजा करण्याची संधी मिळणार आहे.
आषाढी यात्रा कालावधी २२ जून ते ५ जुलै २०२० असा राहणार आहे. आषाढी यात्रा एकादशीनिमित्त असणारी विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १ जुलै रोजी पहाटे २.२० वाजता होणार आहे.
मुख्यमंत्र्यांबरोबर शासकीय महापूजेचा दर्शन रांगेतून निवडलेल्या भाविकाला मानाचा वारकरी म्हणून मान देण्यात येतो, परंतु यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना बंद आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे वीणेकरी यांची मानाचा वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
सहा वर्षांपासून मंदिरात वाजवतात वीणाविठ्ठल ज्ञानदेव बडे हे मागील ५ ते ६ वर्षांपासून मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेत. ते स्वत: व त्यांचे कुटुंबीय देखील माळकरी आहेत. मागील ३ महिन्यांपासून लॉकडाऊन असताना देखील वीणा वाजवून पहारा देत आहेत. लॉकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत.