बार्शी/सोलापूर : बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडी येथील सुपुत्र काश्मीरमधील लेह येथे भारतीय सैन्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेले भास्कर सोमनाथ वाघ यांचा काश्मीरमधील लेहहून कारगिलकडे जात असताना झालेल्या अपघातात मृत्यू होऊन वीरमरण प्राप्त झाले. त्यांचे वय ३९ वर्षे होते.
भास्कर हे १४ जुलै २००० रोजी सैन्यात भरती झाले होते. सध्या ते लेह युनिट क्रमांक १३७ मध्ये हवालदार म्हणून देशसेवा करत होते. मंगळवार १४ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या चार सहकारी सैनिकांसोबत कारगिलकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात वाघ हे जखमी झाले होते. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी त्यांना वीरमरण प्राप्त झाले.
दरम्यान, त्यांनी नाशिकच्या अटलरी प्रशिक्षण केंद्रात लष्करी प्रशिक्षण घेतले होते. भास्कर वाघ यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर माध्यमिक शिक्षण शिराळे (ता. बार्शी) येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण झाडबुके महाविद्यालय, बार्शी येथे पूर्ण केले, अशी माहिती गावच्या पोलिस पाटील सुवर्णा डोळे यांनी दिली.
त्यांच्या पश्चात आई राजूबाई, वडील सोमनाथ वाघ, पत्नी राणी वाघ आणि ११ व १३ वर्षाच्या दोन मुली, २ वर्षाचा एक मुलगा असल्याचे त्यांचे बंधू फौजदार दत्ता वाघ यांनी सांगितले.
लष्कराच्या विमानाने त्यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी पुणे येथे येणार आहे. त्यानंतर वाहनाने तो गावी वाघांचीवाडी येथे पोहचणार असल्याचे निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांनी सांगितले.