सोलापूर : कृषी विभागातर्फे जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या भाजीपाल्याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या भाजीपाल्याची माहिती प्रत्येक तहसीलदारांकडे देऊन प्रत्येक तालुक्यातील गावामध्ये भाजीपाला मिळेल अशी व्यवस्था करण्यात येत आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात भाजीपाला उपलब्ध आहे त्यांची नावे व्यापाऱ्यांना दिली जातील, तेथून तो भाजीपाला थेट नागरिकांपर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न असेल. जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीत दररोज सकाळी सहा ते आठ या वेळात भाजीपाला लिलावाला परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गाड्या बाजार समितीकडे येण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. हा भाजीपाला शहरांमध्ये किरकोळ व्यापार्यांपर्यंत पोहोचवला जाईल. त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी विनाकारण कोठेही गर्दी करू नये.
दररोज भाजीपाला नागरिकांना आपल्या घराजवळ उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. सोलापुरात गेल्या दोन दिवसात सकाळी भाजीसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाल्याचे चित्र दिसत आहे. भाजीपाल्याचा तुटवडा होणार नाही दररोज भाजीपाला मार्केट यार्डातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर येणे टाळावे. गरज असेल तेव्हाच खरेदीसाठी बाहेर पडावे भाजीपाला व अन्नधान्याची कोणतीही टंचाई होणार नाही याची खबरदारी प्रशासन घेत आहे.