सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या काळात वाहनांची तपासणी करण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर पोलिसांसह ४१ तपासणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तपासणी नाका असणाºया ठिकाणी सीसी कॅमेरे तैनात करण्यात येत असून, ही तपासणी पारदर्शक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत शुक्रवारी सायंकाळी डॉ. भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तपासणी नाका ठिकाणी जप्त करण्यात येणाºया रकमेबाबत पथकाकडून जागीच निर्णय घेऊ नये. तपासणीदरम्यान आढळून आलेली रक्कम ही खर्च नियंत्रण विभागाकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. खर्च नियंत्रण विभागात यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती अंतिम निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.
सोलापूर लोकसभेसाठी १८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येत आहे. मतदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्यांचे वितरण १६ रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोहोळ येथील शासकीय धान्य गोदामातून, सोलापुरातील नॉर्थकोट मैदानावर,नूतन मराठी विद्यालय, अक्कलकोट तहसील,सोरेगाव एसआरपी कॅम्प, पंढरपूर धान्य गोदाम येथून निवडणुकीत अधिकारी व कर्मचाºयांना ईव्हीएम मशीन व अन्य आवश्यक साहित्य साधनसामुग्री देऊन त्यांना मतदान केंद्राकडे रवाना करण्यात येणार आहे.
सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाची प्रक्रिया निर्भयपणे व्हावी, यासाठी १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार, राजकीय प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मतदानाबाबत जनजागृती वाढावी यासाठी व्यापक जनजागृती कार्यक्रमही राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
दहा लाखांपुढील रक्कम आयकर विभागाकडे - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ४१ तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत़ तपासणीदरम्यान १0 लाखांपेक्षा जास्त रक्कम आढळून आल्यास ती आयकर विभागाकडे देण्यात येणार आहे. याबाबत कोणतीही कागदपत्रे असली तरीही ही रक्कम आयकर विभागाकडेच सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
सहा मतदान केंद्रांत फक्त महिलांचेच राज्यनिवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रात केवळ महिला अधिकारी व कर्मचाºयांचीच नेमणूक करण्यात येणार आहे. सखी मतदान केंद्र असे नाव या मतदान केंद्राला देण्यात येत आहे. सोलापुरातील शरदचंद्र पवार प्रशाला, अक्कलकोट येथील शहाजी हायस्कूल, सोलापुरातील विक्री कार्यालय, नेताजी सुभाषचंद्र शाळा आदी ठिकाणी हा उपक्रम घेण्यात येत आहे.
साडेपाचला होणार प्रात्यक्षिक १८ एप्रिल रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदान घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी पहाटे साडेपाच वाजता मतदान केंद्रात असणाºया मतदान मशीनचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी व कर्मचाºयांचा मतदान केंद्रात एक मुक्काम व पहाटेपासून काम असणार आहे.