करमाळा शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेला मेन रोड अरूंद आहे. नियमित वर्दळीच्या व रहदारीच्या असलेल्या व्यापार पेठेतील मुख्य रस्त्यावर दुचाकी वाहनधारक व चारचाकी वाहनधारक आपली वाहने थेट रस्त्यावर उभी करून दुकानात खरेदीला जातात. या वाहनामुळे रस्त्यावर नियमित वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा त्रास पायी चालणाऱ्यांना होत आहे.
करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौक ते सुभाष चौक, महात्मा गांधी चौक ते फुलसौंदर चौक शिवाय राशीन पेठ, दत्त पेठ व गुजरगल्ली या मार्गावर दवाखाना, मेडिकल, बँक, कापड, इलेक्ट्रीक, सराफ, स्टेशनरीची व्यापार पेठ आहे. या भागात आलेले ग्राहक बँक,दवाखान्या समोर रहदारीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने उभी करून पार्किंग करत असल्याने ये-जा करणा-या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
---
अरुंद रस्त्यामुळे दिवसभर तीच तीच समस्या
एक तर करमाळा शहरातील मेन रोड व व्यापार पेठेतील रस्ते अरुंद आहेत. त्यात या रस्त्यावर समोरासमोरून आलेली चार चाकी वाहने सहजासहजी जाऊ शकत नाहीत. त्यात ही वाहने थेट रस्त्यावरच पार्किंग करण्यात येत असल्याने ट्रॅफिक जॅमच्या समस्येला दिवसभरातून वारंवार सामोरे जावे लागत आहे.
-----
पोलिसांनी मार्ग काढावा
शहरातील या वाहतूक कोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस टेंभुर्णी-अहमदनगर बायपास रस्त्यावर मास्क, लायसन्स, डबल व ट्रिपल सीट, जड वाहतूक या वाहनधारकांवरील कारवाईत व्यस्त असतात. पण शहरातील या महत्त्वाच्या समस्येकडे ते लक्ष देत नाहीत. पोलिसांनी ट्रॅफिक जॅम समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संजय शिलवंत यांनी केली आहे.
१५करमाळा-ट्रॅफिक जॅम
मेन रोडवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे वारंवार होणारे ट्रॅफिक जॅम.