सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे; पण सोलापूर विभागात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे प्रत्येक टप्प्यावर अधिकाऱ्यांचा वेळ वाचणार आहे व वेळेवर न धावणाऱ्या गाड्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याने एसटीचे वेळापत्रक ट्रॅकवर येईल असे जाणकारांचे मत आहे.
एसटी प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, प्रवाशांचा स्थानकावर वेळ वाया जाऊ नये यासाठी प्रत्येक गाडीची लाईव्ह पोझिशन प्रवाशांना घरबसल्या कळावी यासाठी विभागातील सर्व गाड्यांना ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना ॲप्लिकेशनच्या माध्यमातून प्रत्येक गाडीची लाईव्ह स्थिती पाहता येणार आहे. गाडीच्या अंदाजानुसार प्रवासी हे स्थानकात जाऊ शकतील. यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल.
सोलापूर आगारात ११४ बसेस आहेत. या सर्व बसेसला जीपीएस बसवण्यात आले आहेत. जवळपास साडेसहाशे बसेस आहेत. या सर्व गाड्यांनाही जीपीएस प्रणाली बसविण्यात आल्यामुळे सर्वच स्थानकांतून वॉच ठेवण्यास मदत होणार आहे.
चालकाच्या निष्काळजीपणावर बसणार चाप
लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांना नियोजित ठिकाणीच थांबता येते तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी ठरावीक धाब्यांवर आणि हॉटेलवर गाड्या थांबवण्यास परवानगी असते; पण काही वेळा एसटी चालक नियोजित हॉटेलवर न थांबविता इतरत्र गाडी थांबवितात. यामुळे त्याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना बसतो. पण या नव्या पद्धतीमुळे अशाप्रकारे काम करणाऱ्या चालकांवर कारवाई होऊ शकते.
- महामार्गावरून जात असताना अनेक वेळा चालक हे पुलाखालील किंवा गावात गाडी न थांबविता, प्रवाशांना न घेता पर्यायी मार्गावरून जातात. यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. यामुळे काहीवेळा प्रवासी हे संबंधित वाहनाच्या तक्रारीसाठी एसटी कार्यालयात येतात व त्यानंतर त्यावर कारवाई होते. पण व्हीटीएसमुळे गाडी जर नियोजित मार्गावरून न धावल्यासही कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
व्हीटीस प्रणालीचा फायदा
व्हीटीएस प्रणाली बसविल्यामुळे गाडी स्थानकावरून बाहेर पडतात त्या गाडीची जीपीएस सिस्टीम चालू होईल आणि या सिस्टीमद्वारे गाडी कितीच्या स्पीडने रस्त्यावर धावत होती, रस्त्यावर आरटीओ नियमांचे पालन झाले का नाही, गाडी चालविताना ड्रायव्हरने किती वेळा जोरात ब्रेक मारला, कितीवेळा गाडी वेडीवाकडी चालवली व तसेच नियोजित मार्गावर गाडी न चालवता दुसऱ्या मार्गाने चालवली त्याची परिपूर्ण माहिती एस.टी.मधील अधिकाऱ्यांना बसल्या ठिकाणी कळणार आहे.
सोलापूर स्थानकासाठी एकूण चार स्क्रीन
स्थानकातील प्रवाशांना गाडीची माहिती मिळावी यासाठी सोलापूर आगारात एकूण चार स्क्रीन मंजूर करण्यात आले आहेत. यातील सोलापूर स्थानकात दोन मोठे स्क्रीन, ग्रामीण स्थानकावर एक स्क्रीन आणि मोहोळ स्थानकावर एक स्क्रीन असे मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत. गाडी स्थानकात पोहोचण्याच्या अगोदर दहा मिनिटांपासून त्या गाडीची सूचना स्क्रीनवर दिसण्यास सुरुवात होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.