श्रीपूर : वेळापूर येथे चौकात केक कापल्यामुळे संबंधितावर कारवाई व सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांनवर निलबंनाची कारवाई करण्यात आली होती. ही बाब ताजी असताना अकलूज शहर पोलीस चौकीत एका खासगी सावकाराचा वाढदिवस चक्क पोलीस कर्मचाऱ्यांनीच सोन्याची चेन भेट देऊन धूमधडाक्यात साजरा झाला. कायद्याच्या रक्षकांनीच कायदा धाब्यावर बसवल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सबळ पुराव्यासह पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केल्याची माहिती जनसेवा संघटनेकडून देण्यात आली आहे.
जनसेवा संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष व अकलूज ग्रामपंचायतीच्या सदस्या जोती कुंभार यांनी लेखी निवेदनात पुढीलप्रमाणे तक्रार केली आहे. सदर वाढदिवस साजरा करताना फौजदार, पोलीस कर्मचारी, खासगी सावकार उपस्थित होते. या प्रकाराबाबत अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना माहिती दिली असता याबाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार करा, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार जनसेवा संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे लेखी तक्रार करून या तक्रारीची प्रत अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांनाही देण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. जनतेवर प्रशासनाचे अनेक निर्बंध आहेत. दुपारी ४ वाजल्यानंतर बाजारपेठा बंद होतात. तर जमावबंदी अजूनही कायम आहे. अशातच कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस चौकीतच एका खासगी सावकाराचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला आहे. कोरोनाचे नियम हे फक्त जनतेसाठीच आहेत का? असा सवाल निवेदनाद्वारे केला आहे.
----
चौकट-
अकलूज शहर पोलीस चौकीत खासगी सावकाराचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करणाऱ्या पोलीस व यावेळी इनचार्ज असलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे. मोठा जमाव करून पोलीस चौकीत वाढदिवस साजरा करून आपल्या खासगी सावकारीसाठी दहशत निर्माण करण्यासाठी वापर करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी.
- सुधीर रास्ते, सरचिटणीस, जनसेवा संघटना
----
चौकट-
लक्ष देऊन कारवाईची मागणी
अकलूज शहर पोलिस चौकीचे काही दिवसांपूर्वीच सुशोभीकरण करण्यात आले. हा खर्च हा लोकवर्गणीतून केल्याचे सांगितले जाते मात्र यासाठी खासगी सावकार, दोन नंबर धंदेवाले यांचेकडून पैसे घेऊन काम केल्याची माहिती समोर येत आहे. अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुगावकर व पोलीस उपअधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन कारवाई केल्यास, जनमानसात डागाळत चाललेली पोलिसांची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल, अशी मागणी जनसेवा संघटनेने केली आहे
----
याबाबत अकलूज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज आला आहे. त्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करणार आहे.
-
अरुण सुगावकर
पोलीस निरीक्षक
अकलूज पोलीस स्टेशन
----
'धन्यवाद साहेब, चेन गिफ्ट केली साहेबांनी'
अकलूज शहर पोलीस चौकीत एका खासगी सावकाराचा वाढदिवस साजरा करताना एका पोलीस कर्मचाऱ्याकडून चक्क सोन्याची साखळी भेट देण्यात आल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून 'धन्यवाद साहेब, चेन गिफ्ट केली साहेबांनी' अशी टॅगलाइन लावून फोटो व्हायरल केला गेला. याची चर्चा सुरू आहे.