बार्शी : एकत्रित कुटुंबाचा न्यायप्रविष्ट दाव्यातील जमिनीवर बारामती सहकारी बँकेचा बोजा असताना बँकेच्या खोट्या सह्या, शिक्के व नाहरकत खोटा दाखला तयार करून बेकायदेशीर बनावट दस्त केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचा पुणे विभागीय मंत्री सतीश श्रीमंत आरगडे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यास बार्शी येथील न्यायालयात न्या. आर.एस. धडके यांच्यासमोर उभे केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत बार्शी शहर पोलिसांत अंजिक्य श्रीकांत पिसे यांनी फिर्याद दिली आहे. खरेदी देणारे सोमनाथ रमाकांत पिसे (रा. सुभाषनगर, बार्शी), संगनमताने व्यवहार करणारे सतीश श्रीमंत आरगडे (रा. तावडी), आबासाहेब जराड (रा. बार्शी), साक्षीदार अनिल वायचळ (बार्शी), संजय विलास आरगडे (रा. तावडी, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे.
याबाबत पोलिसांत तीन महिन्यांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. यातील तिघांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने नामंजूर केला होता, तसेच सतीश श्रीमंत आरगडे हा फरार झाला होता. आषाढी वारीसाठी मुख्यमंत्र्यांना पंढरपूर येथे पूजेसाठी येण्यास विरोध करण्याची माहिती पत्रकारांना देण्यासाठी त्यांनी १४ जुलै रोजी पंढरपूरच्या पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. बार्शी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व त्यांच्या पथकाने तेथे जाऊन आरगडे यास अटक केली.
यात फिर्यादीतर्फे ॲड. सोहम मनगिरे, ॲड. आय.के. शेख, तर सरकारतर्फे एफ.एम. शेख यांनी काम पाहिले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करत आहेत.