सोलापूर : मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसात दुचाकीवरुन घरी परतणारा दुचाकीस्वार कुंभारवेस येथील नाल्यात दुचाकीसह वाहून गेल्याने त्याचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला. दोन्ही मित्रांनी त्याला नाल्यातून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सलाम साबीर दलाल (वय ३५, रा. जोडभावी पेठ, मंगळवार बाजार, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे.
यातील सलाम दलाल हा तरुण पहाटे दोन वाजेच्या सुमारास कुंभार वेस येथून जोडभावी पेठेतील घराकडे जात होता. मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर पावसानं जोर धरल्याने कुंभार वेसेतील नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. याच मार्गावरुन सलाम दुचाकीवरुन जात असताना नाल्याजवळ त्याचा दुचाकीवरील तोल गेल्याने तो दुचाकीसह नाल्यात पडला.
हा प्रकार लक्षात येताच त्याच्या इतर दोन-तीन मित्रांनी नाल्यातून बाहेर काढून बेशुद्धावस्थेत बाहेर काढले. त्याला उपचारासाठी महेबूब हुमनाबाद याने पहाटे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. विजय सुरवसे यांनी त्याची तपासणी केली असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे. तपासाची सूत्रे फौजदार चक्रधर ताकभाते यांच्यासह सहकाऱ्याकडे दिली आहेत.
वडिलांचा २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूया घटनेतील मृत सलाम दलाल याच्या पश्चात तीन मुले आहेत. एक तीन महिन्याचे बाळ, पाच आणि तीन वर्षांची दोन मुलं आहेत. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात सलामचे वडील साबीर दलाल यांना गोळी लागल्याने जखमी झाले होते, त्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांचाही मृत्यू झाला होता आणि आता कुटुंबातील कर्ता असलेल्या सलाम याचाही मृत्यू झाल्याने दलाल कुटुंबीयांवर ओढावलेल्या संकटाबद्दल दु:ख व्यक्त होत आहे.
सलामचे वडील साबीर दलाल यांना २६/११ च्या हल्ल्यात गोळी लागल्याने ते जखमी होऊन मृत्यू पावले होते. या घटनेला दोनच दिवसांपूर्वी १४ वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर आता ही अशी दुर्दैवी घटना घडली. या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शासनाकडून न्याय मिळावा.- हाजी इम्तियाज दलाल, नातेवाईक
नातलगांसह पोस्टमार्टेम कार्यालयासमोर ठिय्यामयत सलाम याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी आणल्यानंतर नातलगांनी संबंधित प्रकार नाल्याची व्यवस्थित निगा न राखल्याने घडला असून, महापालिका यंत्रणेविरुद्ध कारवाई केल्यानंतरच प्रेत ताब्यात घेण्याची मागणी केली. पोलिसांनी संबंधित प्रकाराची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर प्रेत ताब्यात घेण्यात आले.