सांगोला तालुक्यातील एका गावात २ फेब्रुवारी रोजी सायं. ६ च्या सुमारास ३० वर्षीय विवाहित महिलेवर रणजित ऊर्फ समाधान पांडुरंग हांडे याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. याबाबत पीडितेने फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी रणजित ऊर्फ समाधान पांडुरंग हांडे याच्यावर भादंवि कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात त्यास अटक झाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून ते ११ फेब्रुवारी रोजी दु. १२.३० च्या दरम्यान समाधान हांडे यांचे वडील पांडुरंग तुकाराम हांडे, योगेश पांडुरंग हांडे, चुलतभाऊ धनाजी धुळा हांडे, संजय ऊर्फ सोन्या हांडे यांनी पीडितेच्या घरी तसेच नातेवाइकांच्या घरी जाऊन व गावात भेटून पीडितेला व तिच्या पतीला तुम्ही केलेली केस परत घ्या, केस झाली तर आम्हाला काय फरक पडत नाही, तुमचीच गावात अब्रू गेली असून तुझ्या पत्नीला आता गावात तोंड दाखवायला जागा उरली नाही, तुम्हाला गावात राहायचे असून गावात एकच घर आहे, दोन महिन्यांत रणजित सुटून बाहेर येईल, मग तुमच्याकडे बघतो, अशी त्या चौघांनी वारंवार धमकी दिल्यामुळे पीडितेने मानसिक तणावाखाली येऊन ११ फेब्रुवारी रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबासह नातेवाइकांनी समाधान पांडुरंग हांडे याच्यासह चौघांवर पीडितेला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला होता.
पोलिसांनी त्यांची समजूत काढून मृतदेहावर अंत्यसंस्कार कराल गुन्हा दाखल करून घेऊ, असे सांगितले होते. अखेर पीडितेच्या पतीने फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी समाधान हांडे याचे वडील पांडुरंग तुकाराम हांडे, योगेश पांडुरंग हांडे, चुलतभाऊ धनाजी धुळा हांडे, संजय ऊर्फ सोन्या हांडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.