शिक्षक व पदवीधर मतदारसंघात तीन पक्षांचे एकत्रिकरण करून संघटित शक्तीचा वापर झाला. शिक्षणमंत्री, शिक्षण राज्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे प्रचारात फिरले. त्यामुळे शिक्षण संस्थाचालकांवर दबाव आला. या पराभवाची आम्ही पक्षपातळीवर गंभीर दखल घेतली आहे. राज्यात वर्षभरात महाविकास आघाडी मधला बेबनाव आणि विसंगती अनेक वेळा चव्हाट्यावर आली. हे सरकार अस्थिर आहे. नुकत्याच मिळालेल्या विजयानंतर या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी हुरळून जाऊन बढाया मारण्यास सुरुवात केली असली तरी हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने फक्त नुकसानभरपाई जाहीर केली. पण ती अजूनही शेतकऱ्यांच्या नावावर पैसे जमा झालेले नाहीत. या सरकारबद्दल सर्व आघाड्यांवर नाराजी आहे.
मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्नपूर्वक विधिमंडळात मंजूर करून घेतले. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू दिला नाही, मात्र आजही दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवता आले नाही. न्यायालयात सरकारला कायदेशीर बाजू व्यवस्थित मांडता आली नाही. त्यामुळे मराठाविरुद्ध ओबीसी या नव्या वादाला सरकारने जन्म दिला आहे. आरक्षणावरून धनगर समाज ही नाराज आहे. या सरकारला सामाजिक संतुलन राखण्यात अपयश आल्याची टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली.