- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : कोरोनामुळे राज्यभरात जमावबंदी, संचारबंदीसारखे निर्बंध कडक केलेले (Lockdown in Maharashtra) असताना सोलापुरात (Solapur) आज सकाळी सकाळी एका ठिकाणी मोठी झुंबड उडालेली दिसली. सोलापूर - विजापूर रोडवरील संभाजी महाराज तलावाजवळ मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. हे मासे नेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. (Fish transport tuck accident in Solapur. People Gather to catch fish.)
हा मासे घेऊन येणारा ट्रक विजापूरहून सोलापूरकडे येत होता. रस्त्याच्या कठड्याला ट्रकने धडक दिली. ट्रक पलटी होताच त्यातील जिवंत मासे तलावाच्या सुकत चाललेल्या पाण्यात पडले. या घटनेची माहिती शहरात आणि आजुबाजुच्या परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. यामुळे हे मासे पकडण्यासाठी लोकांची झुंबड उडाली.
लोकांनी पिशव्या भरून मासे पकडले. यासाठी ऐन कोरोना उद्रेकात एवढ्या मोठ्या संख्येने तलावाच्या चिखलात उतरण्यासही हे नागरिक मागे पुढे पाहत नव्हते. ही झुंबड पाहण्यासाठी तलावाबाजुला असलेल्या पुलावरून पाहण्यासाठी गर्दी झाली होती. येणारा जाणारा प्रत्येकजण खाली डोकावून काय चाललेय हे पाहत होता आणि पुढे जात होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून मासे घेऊन जाणाऱ्या लोकांना पोलिस हुसकावून लावीत आहेत.