मंगरुळपीर - दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेततळ्यातील पाण्याच्या आधारे डाळिंबाची बाग फुलवून त्याद्वारे लाखोंचे उत्पन्न घेण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील शेतक-याने केली आहे. डिगांबर गिरी, असे या शेतक-याचे नाव आहे. मंगरूळपीर तालुक्यातील डिगांबर गिरी यांच्याकडे मंगळसा शिवारात वडिलोपार्जित २५ एकर शेती आहे.
प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख असलेले डिगांबर गिरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करून भरघोस उत्पादन घेतात. साधारण पाच वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या शेतीमधील १३ एकरात डाळिंबाची लागवड केली.
हे फळपिक वाढविण्यासाठी सतत पावसाळा किंवा विहिरीच्या भरवशावर राहावे लागू नये म्हणून त्यांनी सामुहिक शेततळे योजनेंतर्गत शेतात शेततळे खोदून घेतले. हे शेततळे ४४ चौरस मीटर आकाराचे असून, यामधील पाण्याच्या आधारे ते डाळिंबाची बाग फुलवितात. या डाळिंबामधून त्यांना आजवर एक कोटीचे उत्पन्न घेतले आहे.